
अखेर दोन वर्षांनी ७० वर्षीय शांताबाईंना मिळाले स्वत:च्या घराचा ताबा !
ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम अंतर्गत मिळाला न्याय
पुणे : लक्ष्मीनगर येथील सत्तर वर्षांच्या शांताबाई भोसले यांचा त्यांचे दोन विवाहित मुले सांभाळ करीत नव्हते. त्याच्या सुना त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करीत होत्या. त्या विरोधात शांताबाई भोसले पुणे उपविभागीय अधिकारी तथा पीठासिन अधिकारी ( दिवाणी न्यायालयात) दावा दाखल केला होता. सर्व बाजू ऐकून घेऊन उपविभागीय अधिकारी तथा पीठासिन अधिकारी ( दिवाणी न्यायालयात) स्नेहा किसवे- देवकाते यांनी १९ मार्च २०२४ मध्ये आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह अधिनियम २००७ व २०१० अंतर्गत आदेश दिले होते. या आदेशा मध्ये शांताबाई भोसले यांची दोन्ही मुले सक्षम असल्याने त्यांनी घर सोडून इतरत्र राहण्यास जावे, दोन्ही मुलांनी प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला निर्वाह ऋत्ता म्हणून आईच्या बॅंकेत तीन हजार रूपये टाकणे त्याची माहिती न्यायालयाला कळविणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले होते.
गेली दोन वर्ष शांताबाई यांना न्यायालचे आदेश असूनही घराचा ताबा मिळत नव्हता. हे प्रकरण ॲड भिवसेन रोकडे व ॲड दिलीप कु-हाडे यांच्याकडे आले. ॲड कु-हाडे यांनी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चुलुमुल्ला रजनीकांत यांना भेटून आदेशाच्या अंमलबजावणी बाबत लेखी पत्र दिले. रजनीकांत यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांना घर ताब्यात देण्यात संदर्भात लेखी अहवाल मागितला .सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत ,पोलीस निरीक्षक कदम यांनी शांताबाई भोसले यांना घराचा ताबा मिळवून दिला. एवढेच नाहीतर शांताबाई यांना साडी भेट देऊन दर महिन्याला लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने शिधा दिला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी शांताबाई ना आश्रू अनावर झाले होते.
” शांताबाई भोसले यांचे जन्मदाती मुले सांभाळ करीत नव्हते. त्या गेली दोन वर्ष स्वत:त्या घराचा ताबा मिळविण्यासाठी संघर्ष करीत होत्या. अखेर हे प्रकरण कौशल्याने हाताळून शांताबाई यांना घराचा ताबा मिळवून दिला आहे. एवढेच नाही तर त्यांना लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याने दत्तक घेतले आहे.”
– रविंद्र कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लक्ष्मीनगर पोलीस ठाणे