अप्पूघर – पुणेकरांच्या गोड आठवणींचा ठेवा
मे आणि जून महिना सुरू झाला की शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात उन्हाळी सुट्ट्यांची उत्सुकता आपण दरवर्षी बघतो. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे जाणार अशी विचारणा केल्यावर काही मुलांच्या तोंडी “मामाच्या गावाला जायचं..” हे उत्तर जणू कोरलेलंच असतं. पण आपल्या पिंपरी चिंचवड परिसरात असेही काही प्रेक्षणीय स्थळे आहेत, तिथे आपण लहान मुलांसोबत एक दिवशीय एक ट्रिप करू शकतो. तर अशाच एका खास ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत.
“अप्पूघर म्हणजे नेमकं काय हो..?” हा प्रश्न तर अनेक लोकांना पण तिथे गेल्यावरच कळतं की, १५ एकर परिसरात पसरलेलं हे जणू काही दुसरं जगच आहे. निगडी प्राधिकरणात पसरलेल्या १५ एकर जागेतील अप्पूघराकडे उन्हाळ्यात अनेक पावले वळू लागतात. अप्पूघर हे नाव ऐकल्यावर प्रत्येक पुणेकरांच्या चेहऱ्यावर हसू उमलते. कारण अप्पूघर ही पुणेकरांच्या बालपणाची एक गोड आठवण आहे. इंदिरा गांधी उद्यान म्हणूनही ओळखले जाते, हे सुंदर उद्यान श्री दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी आहे आणि पुण्यातील सर्वात आकर्षक मनोरंजन उद्यानांपैकी एक आहे.
हे उद्यान २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे आणि सर्वत्र पर्यावरणास अनुकूल वातावरण राखले आहे. हे उद्यान प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे, आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शहरातील सर्वात लोकप्रिय मनोरंजन उद्यानांपैकी एक, अप्पूघर हे पुण्याचे ‘मिनी डिस्नेलँड’ म्हणून प्रसिद्ध आहे.
तुम्ही अप्पूघरामध्ये तुमच्या वेळेचा आनंद घेऊ शकता आणि रोलर कोस्टर राईड्सवर खूप मजा करू शकता. जर तुम्ही पुणे शहरात एक उत्तम मनोरंजन पार्क शोधत असाल, तर तुम्ही अप्पू घराबाबत चूक करू शकत नाही. शालेय सहली सोबतच परिवारासोबत मज्जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येत असतात.
अप्पू घराचा विकास १९८९ मध्ये सुरू झाला आणि तो १९९२ पर्यंत सुरू राहिला. पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील नागरिकांना पर्यावरणपूरक मनोरंजन प्रदान करणे, कुटुंब, मुले आणि तरुण पिढीसाठी सर्व वयोगटांचे मनोरंजन व्हावे हा मूळ उद्देश होता आणि त्यानुसार डिझाइनिंग आणि राईडची निवड करण्यात आली. अप्पू घर येथील सर्व राइड्स उच्च सुरक्षा मानकांसह इटलीमधून आयात केल्या जातात. अप्पू घराने लांब पल्ला गाठला आहे आणि स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. कुटुंब एकत्र येण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. एक कुटुंब उद्यानात ३ ते ४ तास घालवू शकते. 2005 पासून पुष्पक ॲम्युझमेंट्स अप्पू घरचे व्यवस्थापन पाहत आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तो म्हणजे प्रवेश मूल्याचा..!!! तर लहान मुलांसाठी ५० रुपये आणि १०० रुपये असे मूल्य आकारले जाते. जर तुम्ही एक दिवशीय ट्रिपचा विचार करत असाल तर लहान मुलांसाठी रु. ४९९/- आणि मोठ्यांसाठी रु. ५९९/- इतके दर आकारले जातात. यामध्ये विविध प्रकारच्या राईड्स जसे की अप्पू एक्सप्रेस, मेरी कप्स, रोलर कोस्टर, अप्पू कोलंबस अशा विविध राइड्सचा आनंद घेता येतो. तसेच भूत बंगला, सिनेमॅटिक शो, गो कार्टिंग आणि बलून राईड असे विविध आकर्षित स्थळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात धावपळ करून थकला असाल, रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात काहीतरी वेगळं हवं असेल. तर एकदा अप्पूघराला जरूर भेट द्या. ठरलं तर मग, पिंपरी चिंचवड येथील नगरी प्राधिकरणातील इंदिरा गांधी उद्यान स्थित अप्पूघराला तुम्ही कधी भेट देताय..?
-स्वप्निल अनंत काळे
प्रतिनिधी, दैनिक महामेट्रो