आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुदाम पवार यांचे निधन
पुणे : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक, सणसवाडी नालंदा बुद्ध विहाराचे संस्थापक सुदामराव (आबा ) शंकर पवार वय ९३ यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या मूळ गावी सणसवाडी शिरूर येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलं आणि दोन मुली असा असा परिवार आहे.
सुदाम पवार हे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात काही दिवस त्यांनी काम केलं होतं. 1956 मध्ये नागपूर येथे झालेल्या बौद्ध धर्मांतर ऐतिहासिक सोहळ्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यानंतर त्यांनी गावोगावी जाऊन बौद्ध धर्मांतराची चळवळ व्यापक केली .संपूर्ण हयात भर आंबेडकरी चळवळीला अनुकूल असं काम करत राहीले.त्यांचा सामाजिक कामात व्याप मोठा होता. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे देखील ते काही काळ संचालक होते. त्यांनी रयत शिक्षण संस्थेला सणसवाडी या ठिकाणी दोन एकर जमीन तसेच शासनाकडून एक कोटी रुपये मिळून दिले. त्यांनी बौद्ध धर्माचे काम अधिक व्यापक पद्धतीने केले . थायलंडच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुमारे 100 पेक्षा अधिक बुद्धाच्या मोठ्या मुर्त्या उपलब्ध करून ठिकठिकाणी बुद्ध विहारांमध्ये त्याचं वाटप केल. त्यांचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे चास कमान प्रकल्पाच्या धरणग्रस्तासाठी देखील त्यांनी लढा दिला. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचीका दाखल करून धरणग्रस्ताचे प्रश्न मार्गी लावण्याचा देखील प्रयत्न केला. फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या सामाजिक चळवळीत अत्यंत सक्रिय असणारे सुदाम पवार यांचे आज पहाटे त्यांच्या निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी सणसवाडी, शिरूर येथे दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. त्यांच्या निधनांमुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा एक मोठा कार्यकर्ता गमावला असल्याच्या भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत.