आला पावसाळा… डेग्यूपासून स्वत:ला सांभाळा

Dilip KurhadeMaharashtraCityHealthPune20/05/2025154 Views

आला पावसाळा… डेग्यूपासून स्वत:ला सांभाळा

जगामध्ये कोट्यवधी नागरिकांना डेंग्यू रोगाचा संसर्ग होतो. भारतातही ग्रामीण, शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या रोगामध्ये मृत्यूदेखील होतात. या रोगाची साथ, उद्रेक पावसाळ्यात अधिक प्रमाणात होते. दरवर्षी सातत्याने डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

डेग्यू आजाराचा प्रसार: एडीस इजिप्ती नावाची मादी डास चावल्यामुळे या रोगाचा प्रसार होतो.  हा रोग विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यू विषाणुचे डेंग्यू-१, डेंग्यू-२. डेंग्यू-३ व डेंग्यू-४ असे चार प्रकार आहेत. डेंग्यू विषाणूयुक्त डास मरेपर्यंत दुषित राहून विविध व्यक्तींना चावून या रोगाचा प्रसार करतो.  डासाच्या शरीरात डेंग्यू विषाणूची वाढ साधारणतः ८ ते १० दिवसांत पूर्ण होते. एडिस इजिप्ती डास साठविलेल्या स्वच्छ पाण्यात उदा. रांजण, माठ, कुलर्स, पाण्याचे हौद, घराच्या छतावरील टाकाऊ वस्तू, नारळाच्या करवंट्या, टायर आदीमध्ये पैदास होतात. या डासांच्या पायांवर काळे पांढरे रिंग असतात म्हणून या डासांना ‘टायगर मॉस्क्युटो’ सुध्दा  म्हणतात. वाढ अंडी, अळी, कोष, डास या चार प्रकारामध्ये होते. त्यांचा अधिशयन कालावधी ३ ते १० दिवसांचा असतो.

डेग्यू आजाराची लक्षणे: तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या येणे, लागण झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोळे दुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, ताप कमी जास्त होणे,  अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे आढळून येतात. रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू ताप (डेंग्यू हिमोरेजिक फिवर) यामध्ये त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, रक्ताची उलटी होणे, रक्तमिश्रीत किंवा काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे याप्रमाणे लक्षणे आढळून येतात. रक्तस्त्रावयुक्त डेंग्युताप बहुतांशी १५ वर्षांखालील मुलांसोबत वयस्कर व्यक्तींनाही होऊ शकतो त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

*ग्यू शॉक सिंड्रोम: डेंग्यूमध्ये जेव्हा रुग्ण बेशुद्ध होतो त्याला डेंग्यु शॉक सिंड्रोम असे म्हणतात. यामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते.

रोग निदान: सूक्ष्मजीव शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय किंवा सेंटीनल सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्तजल तपासणी करून निश्चित रोगनिदान होते.

उपचार: या आजारावर निश्चित असे उपचार उपलब्ध नाहीत. वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार औषधे व विश्रांती घेणे आवश्यक आहे. अतिशय घाम येणे, वारंवार उलट्या होणे, जिभेला कोरड पडणे अशा परिस्थितीत ओ आर. एस. (मीठ साखर पाणी) द्रावणाचा वापर करावा.

दक्षताः टॅब अॅस्परीन, ब्रुफेन इ. औषधी देऊ नयेत, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली औषधोपचार घेणे रक्तस्त्रावयुक्त डेंग्यूताप (डेंग्यु हिमोरेजिक फिवर) व डेंग्यू शॉक सिंड्रोम या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.

पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाद्वारे करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना: प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे रक्तनमुने व रक्तजल नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू संस्था तपासणी करण्यात येते. यामध्ये आढळून आलेल्या बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचार करण्यात येतो व परिसरात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येते. डास अळी व डास नियंत्रण ही सर्वात महत्वाची कृती आहे ती प्रभावीपणे सर्वेक्षणाद्वारे करण्यात येते.

आरोग्य विभागामार्फत घरातील सांडपाण्याचे रिकामे न करता येणारे पाणीसाठ्यात अॅबेटींग केले जाते. जैविक उपाय योजनाअंतर्गत डासोत्पती स्थानात गप्पीमासे सोडण्यांत येतात. हे मासे डासांच्या अळ्या खातात. सर्व आरोग्य संस्थेत गप्पी मासे मोफत मिळतात. उद्रेकग्रस्त भागात धुर फवारणी केली जाते. आठवडयात ०-३-७ दिवसाच्या अंतराने धुरफवारणी केली जाते.

नागरिकांनो, काळजी घ्या: डेंग्यूचा डास हा सामान्य डासांपेक्षा वेगळा असतो आणि तो दिवसा चावतो. घरामध्ये आणि आजूबाजूला डासांची पैदास होऊ देऊ नका. कुलर मधील पाणी नियमित बदला. पावसाळ्यात कुंड्या बाटल्या किंवा इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नका. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. व्हेंट पाईपला जाळी बसवून घ्यावी. कुंड्या, फुलदाण्यातील पाणी सतत बदला. गटारी नाले वाहते करा. घरातील बॅरल, भांडी हवाबंद झाकणाने / कापडाने झाकून ठेवा. पक्षांना गुरांना पिण्यासाठी ठेवलेले पाणी सतत बदला व ते भांडे आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे. घराच्या गच्चीवर पाणी साठू देऊ नका. फ्रिजच्या मागील साठलेले पाण्याचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे करा, याप्रमाणे नागरिकांनी याप्रमाणे दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल.

बबिता कमलापुरकर, सहसंचालक, आरोग्य सेवा: या आजाराविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्यादृष्टीने हा आजार होऊच नये याकरीता नागरिकांनी आरोग्य विभागाच्यावतीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. या आजारावर मात करण्याकरीता प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून योग्य काळजी घ्यावी. बाधित रुग्णांनी वेळीच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करुन तात्काळ उपचार सुरु करुन घ्यावे. तसेच किटकजन्य आजारावर नियंत्रणय ठेवण्यासाठी सहकार्य करावे.

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...