
” आशावादी सुसंवादी जग निर्माण करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याची गरज”
प्रादेशिक मनोरुग्णालय मध्ये जागतिक समाजकार्य दिन उत्साहात साजरा!
पुणे : जागतिक समाजकार्य दिवसाचे यावर्षीचे घोषवाक्य ” आशावादी सुसंवादी जग निर्माण करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याची गरज” असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले. प्रादेशिक मनोरुग्णालयातील समाज सेवा अधीक्षक विभाग रुग्ण नातेवाईक व रुग्णालय प्रशासन यामधील दुवा अथवा समाजसेतू म्हणून सर्वोतोपरी योगदान देत असल्याचे हि त्यांनी नमूद केले.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय मध्ये जागतिक समाजकार्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी वरिष्ठ मनोविकृती तज्ञ डॉ. संजय कलगुटकी, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, डॉ. संदीप लहाने , डॉ. शमा राठोड, डॉ. वर्षा बेडककर , वैद्यकीय अधिकारी शेळके , पाखरे , गायकवाड व सर्व समाजसेवा अधीक्षक, बाह्यरुग्ण विभागातील मनोमित्र आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
डॉ. संजय कलगुटकी यांनी मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७ विषयी रुग्णाचे अधिकार, नातेवाईकांची जबाबदारी व रुग्णाचे मनोरुग्णालयातील प्रवेश व डिस्चार्ज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच समाजसेवा अधीक्षक गीता कारंजकर आणि रोहिणी भोसले यांनी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेले मनोमित्र आणि त्यांचे नातेवाईक यांच्या दिलखुलास गप्पावर आधारित समोयोचित कार्यक्रम झाला . त्यांनी रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या सोयी – सुविधा, त्यांचे उपचारादरम्यान चे अनुभव, नातेवाईकांच्या मनातील प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
प्रस्ताविकामध्ये समाजसेवा अधीक्षक भाऊसाहेब माने यांनी जागतिक समाजकार्य दिवसाचे महत्त्व सांगितले . विभाजित समाजाला एकत्रित आणण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली.
डॉ शमा राठोड यांनी समाज सेवा अधीक्षकांच्या कार्य आणि त्यांनी मनोरुग्णालयातील महत्वपूर्ण भूमिका, घेत असलेले परिश्रम याबद्दल विवेचन करून जागतिक समाजकार्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणामध्ये अधिक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये समाजसेवा अधीक्षक यांचा महत्त्वपूर्ण सहभाग, होत असलेली कामे, देण्यात येणाऱ्या सुविधा, आणि त्यांनी रुग्णालयात सातत्यपुर्ण कारवायाची कामे, समाजसेवा अधीक्षक यांच्या कामाची प्रशंसा करत कामाचे कौतुक केले. तसेच जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक संजय जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मोहन बनसोडे यांनी केले.