कारनामा!*
*कार ड्रायव्हिंग एक आनंद सहल!*
कोणतीही गोष्ट शिकेपर्यंत अनंत अडचणी, समस्या येत असतात! ज्या अनिवार्य असतात! असं म्हणतात “समस्या नाही असा मनुष्य नाही, आणि समस्येचे समाधान नाही, अशी समस्या नाही” म्हणजे काय तर प्रत्येक समस्येला उत्तर असतं! ते उत्तर वा उत्तरे शोधण्याची इच्छाशक्ती आपल्या मध्ये किती आहे, त्यावर ती समस्या कधी सुटणार, कशी सुटणार हे अवलंबून असते.
आता हेच पहा, कार ड्रायव्हिंग शिकणं हे खूप जणांचं स्वप्न असतं! पण मनात भीती खूप असते! कार ड्रायव्हिंग स्कूल लावून सुद्धा काही जणांना कार ड्रायव्हिंग येत नाही! शेजारी बसणारा इन्स्ट्रक्टरच क्लच, ब्रेक ऑपरेट करत असल्यामुळे ही समस्या बहुतेकांना येते!
अशा लोकांना गेल्या आठ वर्षांपासून मी त्यांच्या कारवर, त्यांच्या घरी जाऊन, कार शास्त्रोक्त पद्धतीने शिकवतो. त्यामुळे आता ते अगदी बिनधास्त आणि बिनदिक्कतपणे कार ड्रायव्हिंग करतात! कार ड्रायव्हिंगचा आनंदही उपभोगतात!
माझी एक स्टुडंट होती डॉक्टर रुजुता देशपांडे, ती फिजिओथेरपीस्ट आहे. तिचे बेसिक ट्रेनिंग झाल्यावर आम्ही long drive ला गेलो. शनिवार पेठ ते रावेत, रावेतचा संत तुकाराम पूल, हे डेस्टिनेशन होते. तिथे पोहचेपर्यंत तिच्याकडून अनेकदा गाडी बंद पडली. पण ती गाडी मात्र चांगली चालवत होती, आणि चक्क तिसऱ्या आणि चौथ्या गिअर वरही चालवत होती, अगदी चाळीस पन्नासच्या स्पीडने, त्यामुळे तिला कार ड्रायव्हिंगची मजाही येत होती.
तिला मी विचारले “आज long drive करताना कसं वाटतं आहे? आत्मविश्वास वाढला की नाही?”
त्यावर ती म्हणाली ” सर माझ्याकडून काही वेळा गाडी बंद पडली. पण आता मी चक्क चौथ्या गिअर वर गाडी चालवत आहे आणि मजाही खूप येत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी जी भीती वाटत होती की आपल्याला गाडी जमेल की नाही? पण आता गाडी जमतेही आहे आणि नुसती जमत नाही तर मजाही येत आहे आणि पुणे शहरापासून दूर आल्यावर, जणू सहलीचा आनंदही मिळतो आहे. मी तर माझ्या सर्व मैत्रिणींनाही आवर्जून सांगेन की, कार ड्रायव्हिंग नक्की शिका! स्वतः कार ड्रायव्हिंग करत शहरापासून दूर दूर कुठेतरी फिरायला जाणे यात काय मज्जा येते, ते मी किंवा कोणी सांगून नाही कळणार! त्यासाठी स्वतः कार ड्रायव्हिंग करणं आवश्यक आहे ”
ऋषी कपूर, नितू सिंह, राकेश रोशन यांचा एक खूप सुंदर सिनेमा होता, “खेल खेल में ” नावाचा. रोमॅण्टिक आणि सस्पेन्स थ्रिलर असा तो चित्रपट! त्या मध्ये राकेश रोशनची मैत्रीण दाखवली आहे अरूणा इराणी! एकदा राकेश रोशन तिला भेटायला जाताना एक भली मोठी कार, इम्पाला कार घेऊन जातो आणि म्हणतो”डार्लिंग ये तुम्हारे लिये हैं!”
अरूणा इराणी खूपच खुश होते.
“सपना मेरा बित, वो ना रहा, कुछ ना रहा”
या गाण्यात ती राकेश रोशन बरोबरच्या कार मधील आठवणी एकेका कडव्यातून व्यक्त करत असते.
राकेश रोशन अगदी जोरात कार ड्रायव्हिंग करत असतो , तेंव्हा ती म्हणते, राजा गाडी तो हवा से बाते कर रही है!”
आणि ते अगदी मजेत, प्रेमाने Long drive ची मजा लुटत असतात.
तर सांगायचा मुद्दा असा की कार ड्रायव्हिंग आपण जोवर स्वतः शिकत नाही, करत नाही, तो पर्यंत आपल्याला ड्रायव्हिंगची मजा घेता येणार नाही.
मी अगदी अलीकडेच म्हणजे मागच्या रविवारीच एका फूड इंडस्ट्रीतील प्रोफेसर असणाऱ्या इशा फाटक यांना कार ड्रायव्हिंग शिकवत असताना म्हटले की खाणं बनविताना ज्या प्रकारे हळद मिठाचा योग्य प्रमाणात वापर करतो, त्याच प्रमाणे कार ड्रायव्हिंग मध्ये क्लच, ब्रेक इत्यादी गोष्टींचा वापर करावा लागतो. कोणतीही गोष्ट शिकताना त्या त्या गोष्टीचे एक गणित असते, शास्त्र असते. ते प्रथम प्रथम आपल्याला अवघड जटील वाटते, पण एकदा या अवघड गणितीय पायऱ्या पार केल्या की मग तिथून पुढे खरी कला, कलाकारी, करामत, करमणूक आणि सहल सुरू होते, त्या त्या गोष्टीतूनही प्रचंड आनंद मिळवता येऊ शकतो!
म्हणून मला वाटते, कार ड्रायव्हिंग उत्तमरित्या शिकल्यानंतर, Long drive ची आणि सहलीचा आनंद, सहलीची खरी मजा आपण आत्मनिर्भरपणे उपभोगू शकू, नाही का?
*©️ श्रीकांत वाघ!*