काव्य गोष्टी! : लाजून हासणे अन्….. पाडगावकरांच्या या गाण्याने येते गालिबची आठवण!

Dilip KurhadeLiteraturePoetry24/05/2025120 Views

सौजन्य चाट जिपीटी प्रातिनिधिक चित्र

काव्य गोष्टी !

लाजून हासणे अन्….. पाडगावकरांच्या या गाण्याने येते गालिबची आठवण!
©️ श्रीकांत वाघ पुणे.  

लाजून हासणे अन् हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे!

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्रही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे!
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
लाजून हासणे अन् हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

‘आनंदकंद’ हे वृत्त बहुतेक कवींचे आवडते वृत्त असते! याचे कारण, हे वृत्त काव्यरचना करण्यास तसे सोपे वृत्त आहे. त्यामुळे जर शोध घ्यायचा म्हटलं तर, बहुतेक लोकप्रिय कवींनी या वृत्तात अनेक रचना लिहिल्याचे जाणवेल!
आनंदकंद वृत्त हे अक्षर गण वृत्त आहे.‌ त्याचे लक्षण गीत “ताराप राधिका गा, ताराप राधिका गा!” असे आहे. खरेतर अक्षर गण वृत्तात लग क्रम म्हणजे लगावली सांभाळली जाते, त्या वेळी मात्रा मोजण्याची गरज नसते. पण मात्रा मोजल्यास
त्या २४ असतात!
आणि लगावली क्रम –
गा गा ल गा ल गा गा 
असा असतो!
लाजून हासणे ही रचना – भावगीत कवी मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. या सुंदर भावकवितेला तितकीच समर्पक चाल आणि संगीत दिले आहे श्रीनिवास खळे यांनी, तर गायले आहे ह्रुदयनाथ मंगेशकर यांनी!
मंगेश पाडगावकर यांचा विचार करायचा म्हटल्यास , त्यांनी या आनंदकंद वृत्तात अनेक कविता, भावगीते, आणि गझला सुध्दा लिहिल्या आहेत.
पाडगावकरांचे हे भावगीत मला व्यक्तीशा खूपच आवडते! आजही हे गीत मी अधूनमधून गुणगुणत असतो. अर्थात हे गाणे मी अगदी शाळकरी म्हणजे कळत्या वयापासूनच गुणगुणत होतो. पण या मराठी भावगीतांची गोडी, अधिक करून महाविद्यालयीन वयात अधिकच लागली. त्या काळात मी सदाशिव पेठेतील, रेडिओ स्टार पंडित कमलाकर जोशी यांच्याकडे सुगम संगीत क्लास मध्ये, सुगम संगीत शिकायला जायचो. तेंव्हा तिथे मी माझ्या आवडीची अरूण दाते, हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली गाणी , भावगीते, भजन आदी अधिक प्रमाणात गायचो, गायला शिकायचो!
विशेष करून अरूण दाते यांनी गायलेली गाणी, भावगीते जास्त करून गात असे!
पंडित कमलाकर जोशी सर हे अंध होते. त्यांचे शिकवणे सुंदरच होते. ते मला म्हणायचे “श्रीकांत तू अरूण दातेंनी गायलेली गाणी अतिशय सुंदर गातोस”
अर्थात आमच्या घरी तेंव्हा टेपरेकॉर्डर होता, आणि अरूण दाते, महम्मद रफी, आणि इतरही अनेक लोकप्रिय गायकांच्या कॅसेट भरपूर प्रमाणात होत्या. त्यामुळे कॅसेट लावून, आवडत्या गाण्यांची पारायणे, आणि रियाज भरपूर होत असे!
पाडगावकरांची “लाजून हासणे अन् हासून हे पहाणे” ही रचना अतिशय प्रासादिक आहे. यातील विशेष करून एक कडवे, मला नेहमी मिर्झा गालिब यांच्या एका शेराची आठवण करून देते!
ते कडवे म्हणजे
हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे!
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

या ओळी थेट गालिबच्या,
ये न थी हमारी किस्मत, कि विसाल-ए- यार होता

सौजन्य चॅट जिपीटी चित्र

अगर और जीते रहते, यही इंतिजार होता*
या गझल मधील एका शेराशी थेट नातं सांगणाऱ्या आहेत, तो शेर असा
“कोई मेरे दिल से पूछे, तिरे तीर-ए-नीम कश को
ये खलिश कहॉं से होती, जो जिगर के पार होता”

अर्थ असा की, “कुणी माझ्या हृदयाला विचारायला हवे, तुझ्या नयनांच्या अर्ध – तिव्र बाणाने (अर्धा उरात गेलेला, अर्धा बाहेर राहिलेल्या) माझ्या ह्रदयाची काय अवस्था – अस्वस्थता (खलिश) झाली आहे, पण खरं सांगू, या प्रेमाच्या वेदनेत, अर्धा उरात घुसलेल्या, बाणाने एक आगळीच मजा अनुभवतो आहे, ही अस्वस्थता पुन्हा पुन्हा अनुभवत रहावी, हे दुःख चघळत रहावे असे वाटते, तुझ्या तिरप्या नजरेचा कटाक्ष – बाण माझ्या ह्रदयात जाऊन अडकून राहिला, त्यामुळे अधिक मजा येत आहे. हा बाण- तीर जर जिगरच्या पार झाला असता, तर, छे या मजेला मी ठार मुकलो असतो. त्यामुळे तुझ्या नजरेचा बाण उरातच राहिला, यात खरी न्यारीच लज्जत आहे” असे गालिबला म्हणायचे आहे.
यावरच पाडगावकर म्हणतात “ज्याच्या हातात बाण आहे त्याला ‘बाण’ झेलण्याची मजा वा दुःख काय कळणार? ज्याच्या उरात तो शिरला त्यालाच ती मजेची वेदना अनुभवता येणार, पण हा तिरपा कटाक्ष बाण जो आहे, तो प्रेयसीचा आहे आणि तो तिने जाणून बुजून नव्हे तर निष्पापपणे , भोळेपणाने मारलेला आहे, मारल्या गेलेला आहे, पण कसे का असेना, आम्ही तर त्या भोळेपणात मारलेल्या बाणाने घायाळ होऊन दिवाणे झालोच”
असो, गालिबच्या त्या गझलेची आणि शेराची आठवण, पाडगावकरांच्या या गाण्याने नेहमीच ताजी होते!
सलाम गालिबला आणि अर्थातच पाडगावकरांनाही! पुन्हा इथे हिंदीतील एक कहावत आठवते “नकल में भी, अकल की जरूरत होती है!”
©️ श्रीकांत वाघ पुणे*
भ्रमणध्वनी: ९९२३३१ ६२११

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...