कृतार्थ : यशवंतराव निकम : शिक्षकांसाठी उपयुक्त आत्मकथन

Dilip KurhadeEducation16/05/2025491 Views

कृतार्थ : यशवंतराव निकम.
( शिक्षकांसाठी उपयुक्त आत्मकथन.)
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातातून शिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त झालेले यशवंतराव निकम यांनी लिहिलेले ‘कृतार्थ’ हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले.सातारा जिल्ह्यातील ‘ मिलिटरी अपशिंगे ‘ हे त्यांचे मूळ गाव.या गावातून आलेल्या निकम यांनी आपला शिक्षक ते शिक्षणाधिकारी व प्रशासकीय अधिकारी असा प्रवास ‘कृतार्थ ‘ या आत्मकथेतून उलगडून दाखविला आहे.अपशिंगे गावाचे भूषण म्हणजेच गावातला ‘ विजय स्तंभ’. पहिल्या महायुद्धातील गावाच्या पराक्रमाचे प्रतीक.या आत्मकथेच्या मुखपृष्ठासाठी ‘ विजय स्तंभा’चा कल्पकतेने वापर केला आहे.अपशिंगे गावाचे वर्णन तसेच गावाचा इतिहास व निकम कुटुंबातील सदस्यांचे सुंदर चित्रण केले आहे.गावातील सण समारंभ, लग्नातील प्रथा परंपरेचे मनोरंजक वर्णन याठिकाणी वाचावयास मिळते.शालेय शिक्षण घेत असताना प्रभाव पाडणाऱ्या शिक्षकांची माहिती वाचताना खूपच छान वाटते. शाळेतील उपक्रम देखील सांगितले आहेत.प्री डिग्री नंतर मेडिकलचे स्वप्न पूर्ण न झाल्याने त्यांनी बी.एस.सी.केले.त्याकाळी बी. एस. सी.नंतर शिक्षकाची नोकरी लागत असे.रयत शिक्षण संस्थेत शिक्षक पदावर नोकरीला लागल्यानंतर बी.एड.पूर्ण केले. शिक्षक पदावर काम करतानाचे विलक्षण अनुभव,त्यांनी राबविलेले विविध शैक्षणिक उपक्रम यांचे सुंदर वर्णन वाचावयास मिळते. विज्ञान विषय असल्याने स्वभाव सतत प्रयोगशील. विद्यार्थी व गावकऱ्यांमध्ये लोकप्रिय. विविध प्रशिक्षणे नोकरीच्या काळात केली.बाहुली नाट्याचे प्रयोग करून आलेली रक्कम शाळेला देणगी म्हणून दिली.
शिक्षक पदावर असताना एम.पी.एस.सी.परीक्षा देऊन प्रथम अधिव्याख्याता व नंतर शिक्षणाधिकारी पदासाठी निवड हा प्रवास खूपच वाचनीय झालाय.मुलाखतीचा प्रसंग तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरेल. त्या नंतर प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळाला.श्री.निकम अत्यन्त संवेदनशील असल्याने प्रशासकीय कामकाजातील येणाऱ्या अडचणी,त्यातून काढलेला मार्ग,कधी कधी मानहानीचे प्रसंग खूप अस्वस्थ करून जातात.त्यातूनच मुदतपूर्व सेवानिवृत्ती घ्यायला भाग पडणाऱ्या प्रसंगाचे वर्णन तटस्थ भूमिकेतून केले आहे.
जेष्ठ साहित्यीक डॉ. न.म.जोशी यांनी लिहिलेली पत्ररूपी प्रस्तावना खूपच वाचनीय.या आत्मकथेची चार बलस्थाने त्यांनी सांगितली आहेत ती म्हणजे,’माहितीची मांदियाळी’,’संपन्न सांस्कृतिक आशय’,’प्रासादिक वर्णनशैली’ व ‘उत्कट,विव्हल, कृतार्थ, प्रत्ययकारी आणि अंतर्मुख करणारे अनेक प्रसंग’.मुळातच गोष्टी वेल्हाळ स्वभाव, विद्यार्थ्यांप्रति तळमळ,सामाजिक भान,जीवनातील प्रसंग तपशीलवार दिल्याने वाचक गुंतून जातो.आनंद यादवांच्या पुस्तकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सर्व शिक्षकांना अंतर्मुख व्हायला लावणारे हे आत्मकथन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामीण वातावरण अनुभवायचे असेल तर हे पुस्तक अवश्य वाचायला हवे.

पुस्तकाचे नाव :कृतार्थ.
लेखक : यशवंतराव निकम.
 मोबाईल नंबर – ९८२२९९९०१६.
प्रकाशक: श्रीगणेश प्रकाशन,जुनी सांगवी,पुणे २७.
पृष्ठ :४३४

(श्री.सुदाम कृष्णाजी विश्वे,
(निवृत्त कलाशिक्षक)
पुणे – ४११०२१.
मोबाईल ९८६०५८६१४७.)

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...