कैदी संचलित शृंखला उपहारगृहाची वार्षिक उलाढाल एक कोटी वीस लाख ९१ हजार रूपये
खुल्या कारागृहातील चोवीस कैद्यांना करतात काम ; सात लाख रूपयांचा पगार जमा
येरवडा : येरवडा खुल्या कारागृहामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘शृखंला उपहारगृहाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या शृंखला उपहारगृहाला आयटी इंजिनीअर आणि परिसरातील खवय्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या उपहारगृहाने वर्षभरात तब्बल एक कोटी वीस ९१ हजार लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कैद्यांचा पगार सात लाख रूपये आणि कच्चामालाचा खर्च ९८ लाख ७३ हजार रूपये तर निव्वळ नफा पंधरा लाख रूपये झाल्याची माहिती खुल्या कारागृहाचे अधिक्षक अनिल खामकर यांनी दिली.
खामकर म्हणाले, ‘‘येरवडा कारागृहाच्या आवारात ‘कॉमर झोन’ आयटी पार्क शेजारी ‘शृंखला’नावाचे उपहारगृह गेल्या वर्षी ८ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू करण्यात आले. उपाहारगृहात न्याहरीत पोहे, उपमा, इडली, उडीदवडा, मसाला डोसा, उतप्पा, जेवणात भाजी, पोळी, वरण भात तर सायंकाळी गरमागरम भजी, वडापाव, चहा मिळतो. या उपाहारगृहाची मूळ कल्पना उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची आहे. त्यांनी येथील उद्योग संधी ओळखून त्यांनी उपाहारगृहाचा प्रस्ताव तयार केला होता.’’
कारागृहाच्या एक एकर जागेत उपाहारगृह उभारले आहे.येथे खुल्या कारागृहातील २४ शिक्षाधीन कैदी विविध खाद्यपदार्थ तयार करणे, वेटर, हाऊसकिपींगेच कामे करीत आहेत. कॉमरझोन आयटी पार्क मध्ये अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यातील शेकडो कर्मचाऱ्यांनी शृंखला उपाहारगृहाला पसंती दिली आहे. आठवड्यातील रविवार वगळता सर्व दिवस उपाहारगृह सकाळी सात ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू असते. येथील व्यवस्थापन कारागृहाचे कर्मचारी अविनाश पवार पाहतात.
एक कोटी १३ लाख ४५ हजार रूपये ऑनलाईन विक्री
शृंखला उपाहारगृहातील ग्राहक हे आयटी कंपनीतील असल्याने सर्वजण ऑनलाईन पेमेंट करण्यावर भर देतात. त्यामुळे वर्षभरात एक कोटी १३ लाख ४५ हजार रूपयांचे ऑनलाईन विक्री झाली आहे. तर ज्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा नाही अशा ग्राहकांनी सात लाख ४३ हजार रूपयांचे रोख पेमेंट दिले आहे. उपाहारगृहातील सर्व कच्चा माल ब्रॅंड कंपनीचे असल्यामुळे तसेच खाद्य पदार्थांची किंमत माफक असल्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे व्यवस्थापक अविनाश पवार यांनी सांगितले.
‘‘शृखंला उपाहारगृहाच्या माध्यमातून कैद्याची सुधारणा व पुनर्वसन हा मुख्य उद्देश आहे. कैदी कारागृहा बाहेर पडल्यानंतर त्यांना स्वत:चे उद्योग सुरू करता येऊ शकते. सध्या उपाहारगृहात न्याहरी, जेवण आणि चहा माफक दरात मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांची विशेषत: आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची गर्दी होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे शृंखला उपाहारगृहाची दुसरी शाखा येरवड्यातील आयबीएम आयटी कंपनीच्या समोर कारागृह प्रशासनाच्या जागेत सुरू करीत आहे.’’
– स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम महाराष्ट्र
जर्मनी ते पुणे अपडाऊन करणारे शृंखलाचे ग्राहक
कॉमरझोन कंपनीत अनेक देश विदेशातील कंपन्या आहेत. काही कंपन्या जर्मनी व भारतात आहेत. यातील अनेक कर्मचारी कॉमरझोन येथील जर्मनीच्या कंपनीत कामा निमित्त ये जा करीत असतात. त्यामुळे त्यांचा जर्मनी ते पुणे अपडाऊन प्रवास सुरू असतो. येथे आल्यानंतर ते हमखास शृंखलातील खाद्य पदार्थांचा अस्वाद घेत असल्याची माहिती रोहन देशपांडे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.