कैद्यांची लाईफ स्टाईल दारिद्ररेषेच्यावर !
जेवण, चहा , न्याहरीसह पाणी व वीजेचा वापराचा दैनंदिन खर्च १७० रुपयांपेक्षा अधिक
कैद्यांना बाहेरील जगापेक्षा कारागृह बरे
येरवडा: केंद्र सरकारने कुटुंबाच्या दारिद्ररेषेच्या उत्पन्नाची अट ठेवली आहे. एखाद्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५८ हजाराच्या आत असेल तर ते कुटुंब दारिद्ररेषेच्या आत ( बीपीएल) समजले जाते. जर त्याचे उत्पन्न ५९ हजार झाले तरी ते कुटुंब दारिद्ररेषेच्यावर ( एपीएल) गणले जाते. या निकषांचा विचार केला तर एखाद्या कैद्याला कारागृहात किती खर्च होतो याचा हिशोब केला तर तो ६२ हजारापेक्षा अधिक होतो. एखादा कैदी कारागृहात काम करीत असल्यास त्याचे उत्पन्न वीस ते पंचवीस हजाराच्या घरात जाते. यासह दरमहा काही कैद्यांना मनिऑर्डर सुद्धा नियमित येत असते. यासर्वांचा विचार केला तर एका कैद्याचा कारागृहातील खर्च लाखाच्यावर जातो. याचा अर्थ कैद्याची कारागृहातील लाइफ स्टाईल दारिद्ररेषेच्यावरील कुटुंबापेक्षा कमी नसते.
केंद्र सरकारने देशातील एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न ५८ हजारापेक्षा कमी असेल तर त्या कुटुंबाला दारिद्ररेषेखाली ( बीपीएल) म्हणून समजले जाते. कुटुंबाच्या उत्पन्नात हजार ते दोन हजाराची भर पडली तर ते कुटुंब दारिद्ररेषेच्या वर येते. हे उत्पन्न हास्यापद असले तरी सरकारचे निकष आता तरी बदलता येणार नाही. त्याच वेळी राज्यातील कारागृहातील एका कैद्यावर सरकारचा होणारा खर्च हा दारिद्ररेषेच्या वरील कुटुंबाच्या उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे वास्तव आहे. कारागृहात कैद्यांना सकाळी दुध, अंडी, चहा, न्याहरी, सकाळी दहा वाजता व चार वाजता जेवण दिले जाते याचा खर्च प्रत्येकी कैदी प्रमाणे १३० ते १४० रूपये होतो. यासह ते वापरत असलेले पाणी व वीजेचा वापर याचा विचार केला तर तो खर्च तीस ते चाळीस रूपयां पर्यंत जातो. याचा अर्थ प्रत्येक कैद्याला दिवसाला १६० ते १७० रुपये खर्च येतो. हा खर्च सहाजिकच साठ हजारापेक्षा अधिक होतो.
कारागृहात काम करणाऱ्या कैद्यांना कुशल ( ७२ रुपये), अर्धकुशल ( ६५ रूपये) तर अकुशल ( ५५ रूपये) पगार दिला जातो. या पगाराचा विचार केला तर वर्षभरात कैदी वीस हजारापेक्षा अधिक रूपये कमवतात. त्यानंतर अनेक कैद्यांना दरमहा त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी नियमित मनीऑर्डर करतात. या सर्व पैशांची गोळाबेरीज केली तर एक कैदी वर्षाला एक लाखा पेक्षा अधिक खर्च करू शकतात. याचा अर्थ त्यांची लाइफ स्टाईल ही दारिद्र रेषेच्या वरील कुटुंबा सारखी असते. त्यामुळे बाहेरच्या जगापेक्षा कारागृहच बरे असे कैद्यांना वाटत नसले तर नवल म्हणावे लागेल.‘‘ कारागृहातील प्रत्येक कैद्यांचा चहा, न्याहरी व दोन वेळच्या जेवणावर खर्च होतो. यासह पाणी आणि वीजेचा वापर याचा विचार केला तर कैद्याचा दैनंदिन खर्च १६० ते १७० रूपये आहे. त्यामुळे वार्षिक खर्चाचा विचार केल्यास तो साठ हजारापेक्षा अधिक होतो. ’’
– सुनिल ढमाळ, अधिक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह
एका मनोरुग्णावर दैनंदिन तीनशे रूपया पेक्षा अधिक खर्च
येरवडा मनोरूग्णालयातील एका मनोरुग्णांचा दैनंदिन खर्च हा तीनशे रूपया पेक्षा अधिक आहे. रुग्णाला अधिक पौष्टीक अन्नपदार्थ , औषधोपचारांसह विविध उपचार पद्धती, मनोविकार तज्ज्ञांपासून ते त्यांची काळजी घेणारे परिचर व परिचारिका, समाजसेवक असा शेकडोजण कर्मचारी वर्ग असल्यामुळे त्यांचा दैनंदिन खर्च हा तीनशे रूपया पेक्षा अधिक जात असल्याची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिक्षक यांनी सांगितले.
भिक्षेकऱ्यांचा दैनंदिन खर्च ४२ रूपये
येरवड्यातील फुलेनगर येथील भिक्षेकरी स्विकार केंद्रात शहरातील भिक्षेकऱ्यांना आणून ठेवले जाते. भिक्षा मागणे हा गुन्हा आहे. त्यामुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पोलीसांच्या मदतीने शहरातील भिक्षेकऱ्यांना स्विकार केंद्रात काही दिवस ठेवते. तेथे प्रत्येक भिक्षेकऱ्यांचा दैनंदिन खर्च हा ४२ रुपये आहे. तर त्यांना दिवसाला पाच रूपये पगार दिला जातो.