पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार,दि.११ मे २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर होणार आहे.१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा(मिथक चिकित्सा),मुक्त पत्रकार प्रशांत कदम (न्यायव्यवस्था ते निवडणूक आयोग : स्वातंत्र्य आणि निष्पक्षतेवरचे आक्रमण),लोकसंस्कृतीच्या अभ्यासक स्नेहा टोम्पे (‘मातृत्वतत्त्वांची मिथके’) आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. ‘ गांधी दर्शन’ विषयावरचे हे २० वे शिबीर आहे.
समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर आधारित हे शिबिर आयोजित केले गेले आहे.या शिबिरात सत्य,अहिंसा,सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन यासारख्या गांधीजींच्या महत्त्वपूर्ण तत्त्वांवर सखोल चर्चा होईल.गांधीवादी विचारसरणी आजच्या जगातदेखील कशी उपयुक्त ठरू शकते, यावर प्रकाश टाकला जाईल. महात्मा गांधींच्या विचारधारेचे सखोल चिंतन आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले जाणार असून विचारांनी एक नवी दृष्टी आणि दिशा मिळेल.त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.