गब्बर’ पुन्हा होणे नाही?

गब्बर’ पुन्हा होणे नाही?*

शोलेच्या पन्नाशीतही सिनेरसिक या चित्रपटातील खलनायक असलेल्या गब्बर सिंगला विसरू शकले नाहीत! एक अद्भुत भूमिका अमजद खान यांच्या नशिबाने या चित्रपटात मिळाली. खरंतर ही भूमिका त्यांच्या हातून निसटण्याच्या बेतात होती. मात्र कर्मधर्म संयोगाने ती त्यांना पुन्हा मिळाली, आणि मग त्यांनी ती जीव ओतून अजरामर केली. असा सिनेमा, अशी भूमिका पुन्हा पुन्हा होत नसते!
मुळात सिनेमा हे एक टिमवर्क असते. त्यामुळे एखादी भूमिका गाजते, सिनेमा गाजतो, हिरो गाजतो, तर त्याला केवळ तो वा ती एकच व्यक्ती कौतुकास पात्र नसते, तर ती भूमिका लिहिणारे लेखक, संवाद लेखक, कथाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक, छायालेखक, सिनेमॅटोग्राफर, संगीतकार, कलादिग्दर्शका पासून ते अगदी मेकअप मन, लाईटमन, स्पॉट बॉय पर्यंत सगळ्यांचा त्या यशात हातभार असतो!
शोलेच्या यशात जितका वाटा सलिम जावेद यांचा आहे, तितकाच महत्त्वाचा वाटा, या सिनेमाचं लोकेशन शोधून काढणाऱ्या कलादिग्दर्शकांचा आहे, आणि छायांकन आणि सिनेमॅटोग्राफी करणाऱ्या कॅमेरामनचाही आहे.
या सर्व कलाकारांमुळे यातील प्रत्येक कलाकाराला यश मिळाले, नाव मिळाले असंच म्हणावं लागेल. सर्वांनी शंभर टक्के योगदान दिल्यानेच शोले ही एक अद्भुत कलाकृती निर्माण झाली.
यातील अमजद खान म्हणजे ज्याच्या हातून गब्बरची भूमिका निसटता निसटता पुन्हा नशिबाने हाती आली! ती भूमिका तो जगला, आणि आगळ्यावेगळ्या संवादांमुळे आणि संवाद फेकी मुळे ही खलनायकी भूमिका अजरामर झाली. इतकी की त्या नंतर अनेक निर्मात्यांना, दिग्दर्शकांना गब्बर रात्री स्वप्नात येऊन सतावत राहतो, कि असा खलनायक आपल्याला निर्माण करता येईल का?
खरोखरच तेंव्हापासून आता पर्यंत अनेक निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी प्रयत्न केले, पण पुन्हा गब्बर सिंग सारखा सत्तर एम एम खलनायक चित्रपट पडद्यावर अवतरू शकला नाही!
ज्या डॅनीच्या हातून ही भूमिका निसटली, त्याने अग्निपथ, घातक आदी चित्रपटातून आगळावेगळा खलनायक साकारला! पण गब्बरची जादू त्यात नव्हती. अग्निपथ मध्ये दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी डॅनीला कांचाचिना ही एक जबरदस्त खलनायक साकारण्याची संधी दिली, आणि नेहमी प्रमाणे डॅनी यांनीही ही भूमिका आपल्या जबरदस्त अभिनय क्षमतेने जिवंत केली, डॅनीला आणखी एक भूमिका दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी घातक या सिनेमात दिली होती, कांत्याची, ती भूमिकाही अतिशय सुंदर लिहिल्या गेली होती. आणि डॅनीनेही आपल्या अभिनयाने ती भूमिका चांगलीच गाजवली! पण तरीही गब्बरची उंची नाही गाठता आली.
अमरिश पुरी यांनाही बोनी कपूर यांच्या मिस्टर इंडिया मध्ये मोगॅम्बो आणि राजकुमार संतोषी यांच्या घायल सिनेमात बलवंत राय हे दोन जबरदस्त खलनायक साकारण्याची संधी मिळाली होती. दोन्ही चित्रपट आणि त्यातील अमरिश पुरी यांचा खलनायक गाजला, पण गब्बरचे स्थान अबाधित राहिले!
खुद्द रमेश सिप्पी यांनीही शान चित्रपटात एक आगळावेगळा खलनायक शाकाल नावाने उभा केला होता. कुलभूषण खरबंदा यांनी ती भूमिका जबरदस्त साकारली होती. शाकालची आठवण रसिकांना आजही आहे, पण शाकाल गब्बरची जागा नाही घेऊ शकला.
अमजद खानच्या गब्बर पूर्वी प्राण यांनी जिस देश में गंगा बहती है मधील डाकू राका सह अनेक चित्रपटातील खलनायकी भूमिका गाजवल्या. प्रेमनाथ यांनीही धर्मात्मा, जॉनी मेरा नाम आदी सिनेमात व्हिलन साकारला, त्याचप्रमाणे अजित यांनी तेजा, लायन आदी नावे धारण करून जंजिर, यादोंकी बारात, कालीचरण असे सिनेमे आपल्या खास शैलीत संवाद फेकीने गाजवलेच होते. पण आजही सिनेरसिक म्हणतात “गब्बर सिंग जैसा खलनायक अबतक पैदा नहीं हुआ!”

 

*©️ श्रीकांत वाघ पुणे मो:९९२३३१६२११*

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...