गुढीपाडवा महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील
-नाहिद नालबंद
आपल्या महाराष्ट्रात गुढीपाडवा हा दिवस मराठी नविन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जाती. तसेच नविन वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र महिना अहि. शिवाय हा दिवस महाराष्ट्रात कापणीचा हंगाम असतो. याला संस्कृत मध्ये ‘संवत्सरा पाडी’ असे म्हणतात. हा गुढीपाडव्याचा सण का, कशासाठी साजरा करायचा, या उत्सवामागे काय कारणे आहेत ते समजून घेऊ.
गुढीपाडवा साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा, आख्यायिका आहेत. हिंदू पौराणिक कथा वा आख्यायिकांच्या नुसार गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा दिवस अशी मान्यता आहे. तसेच शालीवाहन राजा पैठणमध्ये परत आला त्या दिवशी ध्वज फडकवले म्हणून शालीवाहन राजाचा विजयाचा दिवस अशीही गुढीपाडव्याच्या दिवसाची मान्यता आहे. ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध करून रयतेला वालीच्या जाचातून मुक्त केले तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. वाईट गोष्टींवर विजयाचे हे प्रतिक आहे. याच दिवशी प्रभू रामचंद्र यांचा चौदा वर्षांचा वनवास काळ पूर्ण झाला म्हणूनही या दिवसाचे महत्व आहे. अजून एका मान्यतेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला भगवान विष्णूंनी मत्स्य रूप घेतले आणि शंकासुराचा वध केला. अशा विविध अर्थांनी या दिवसाचे विशेष महत्व आहे.
महाराष्ट्रात बांबूच्या काठीला नविन वस्त्र बांधतात. त्यावर कडुलिंबाच्या पानांचा आणि साखर बत्ताशांचा (गाठी) हार घालतात. काठीच्या वरच्या टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे भांडे/गडू अडकवले जाते. रांगोळी काढली जाते. कडुलिंबाची पाने खाण्याची या दिवशी प्रथा आहे. या दिवशी गोड पदार्थ विशेषत: पुरण पोळी किंवा श्रीखंड पुरी आणि बटाट्याची भाजी हे खाद्यपदार्थ बनवले जातात. गुढीपाडवा महाराष्ट्रात कसा साजरा करतात. तो साजरा करण्यामागे काय उद्देश आहे हे आपल्याला माहित आहेच. महाराष्ट्राप्रमाणे आपल्या देशाच्या इतर राज्यात ही गुढीपाडवा कसा साजरा केला जातो हे पाहू.
निरनिराळ्या राज्यात गुढीपाडव्याला विविध नावे आहेत. कोकणी समाजात याला ‘संवत्सर पडवो’ असे म्हणतात. कर्नाटकात – युगाडी , दमक, तामिळनाडू- पुथंडु, आंध्र प्रदेशात उगादी, मणिपूर मध्ये सजिबू नोंगमा- पानबा अथवा मेईतेई चेईरा ओबा असे म्हणतात तर काश्मिरी हिंदू गुढीपाडव्याला नवरेह असे संबोधतात.
कोकणी समाजाचा संवत्सर पडवो – कोकणी समाजातही हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. कोकणी समाज चंद्र दिनदर्शिकेचे पालन करतो. या दिवशी घराची तसेच देवघराची स्वच्छता केली जाते. घरासमोरील अंगण स्वच्छ करून पाना फुलांनी व पाना फुलांच्या हारांनी सजवले जाते. अंगणात ओल्या तांदळाच्या पिठाने रांगोळ्या काढतात. देवघरात समई लावली जाते. तसेच देवघराच्या बाहेर एक दिवा टांगला जातो. कुटुंबातील सगळेजण तेल लावून स्नान करतात ,नविन कपडे परिधान करतात. स्त्रिया दागिने परिधान करतात.
कोकणी समाजात कुटुंबाचे एक पुरोहित असतात. पाडव्याच्या दिवशी पुरोहित घरी येतात. त्यांना उंच लाकडी फळीवर बसण्याची व्यवस्था केलेली असते. त्या स्थानाला ‘मानयी’ असे म्हणतात. पुरोहितांच्या समोर सर्व कुटुंब एकत्र बसते आणि पुरोहित पंचाग बघून येणाऱ्या वर्षातील ग्रहांच्या स्थिती, पीक, पाऊस, दुष्काळ, रोगराई आणि इतर आपत्ती बद्दल भाकीत करतात. सर्व सदस्य ही भाकीते अत्यंत गांभार्याने, लक्ष देऊन व धीराने ऐकतात. तसे केल्यामुळे आपत्तीचे, ग्रहांचे दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत अशी मान्यता आहे. पंचागाचे वाचन झाल्यावर कुटुंबप्रमुख पुरोहितांना दक्षिणा देतात आणि कुटुंबातील सर्व सदस्य पुरोहितांचे आशीर्वाद घेतात. नंतर सर्व कुटुंब सदस्य मंदिरात जातात. नैवेध म्हणून साखर व कडुलिंबाची पाने घेतात. पूजा झाल्यानंतर मंदिरातील पुजारी नैवेद्याचा काही भाग परत करतात. साखर आणि कडुलिंबा प्रसाद म्हणून खातात. साखर व कडुलिंबाची पाने. जीवनातील गोड व कडू (चांगले व वाईट) गोष्टींची प्रतीक आहे. देवदर्शन झाल्यानंतर सर्वजण घरी येऊन जेवणाचा आस्वाद घेतात. या दिवशी काही खास पदार्थ बनवले जातात. मुख्य खास पदार्थ ‘हिंट्ट’ (इडलीसारखा), खीर, करी, डाळ इत्यादी पदार्थ बनवले जातात. तसेच लोणचे. आल्याची चरणी असेही पदार्थ बनवले जातात. सर्व पदार्थ केळीच्या पानावर वाढले जातात. सगळेजण एकत्र आनंदाने जेवण करतात. संध्याकाळी सुद्धा मंदिरात जातात. तिथेही पुरोहित संपूर्ण कोकणी समुदायासाठी पंचागाचे वाचन करून भविष्यातील घटनांविषयी अंदाज वर्तवतात.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलगंणा इथे गुढीपाडवा युगाडी किंवा उगादी या नावाने ओळखला जातो. इथे सणाच्या दिवसाच्या आधी आठवडाभर तयारी चालू असते. इथेही ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली तो हा दिवस अशी मान्यता आहे. त्यामुळे ब्रम्हदेवाची विशेष पूजा करण्यात येते. घरांची व अंगणाची स्वच्छता केली जाते. घराच्या दरवाजाच्या वर तोरण बांधली जातात. त्यामागे नववर्षाचे स्वागत करण्याचा हेतू आहे. घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करतात नविन कपडे परिधान करतात. तसेच गोरगरिबांना दानही दिले जाते. या दिवशी एक विशेष पदार्थ बनवला जातो. त्याला पचडी असे म्हणतात. पचडी म्हणजे कोशिंबीर म्हणता येईल. पचडीमध्ये गूळ, मीठ, कैरी, चिंच, कडुनिंबाची पाने यांचा वापर करतात. येणाऱ्या कडू-गोड आठवणींचे स्मरण रहावे म्हणून याची चव गोड, आंबर व तिखट अशा एकत्र चवींचे मिश्रण असते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भक्षालू हा महाराष्ट्रातील पुरण पोळी सारखा पदार्थ बनवतात आणि तूपा बरोबर खाल्ला जातो. याचप्रमाणे कर्नाटकातही पुरणपोळीशी साधर्म्य असलेला पदार्थ दूध, तूप किंवा नारळाच्या दूधाबरोबर खातात.
तामिळनाडू मधील पुथंडू – तामिळनाडूमध्ये तमिळ कालदर्शिकेनुसार हा नविन वर्षारंभाचा सण आहे. चैतिराई या तमिळ महिन्यानुसार हा सण साजरा केला जातो. घराची स्वच्छता केली जाते. अंगणात रांगोळी काढली जाते. अंघोळ करून नविन कपडे घातले जातात. देवाला फुले-फळांची आरास करून देवाची पूजा केली जाते. घरातील जेष्ठ व्यक्तींना आदराने नमस्कार करून आशीर्वाद घेतले जातात. शाकाहारी भोजनाचा बेत केला जातो. तसेच एकमेकांना पुत्तांडु वाळतुक्कळ किंवा इनिय पुत्तांडू नल्लाळत्तुककळ असे म्हणत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. दक्षिण तामिळनाडूमधील काही ठिकाणी या सणाला चैत्तिराई विशू असे म्हटले जाते. देवासमोर आंबा, केळी, फणस इंत्यादी फळांची आरास केली जाते. तसेच सुपारी, विड्याची पाने, सोन्याचा दागिना, पैसे, फुले आणि आरसा वगैरे देवासमोर मांडण्याची पद्धत आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मदुराई येथील मीनाक्षी मंदिरात मोठ्या सोहळा आयोजित केला जातो.
काश्मिरी हिंदूंचा नवरेह – काश्मिरी हिंदू गुढी- पाडव्याला नवरेह असे म्हणतात. हा दिवस देवी शारिका, दुर्गा यांना समर्पित केला जातो पौराणिक कथेप्रमाणे माता शारिका यांचे शारिका पर्वतावर निवासस्थान होते. तिथे एकदा सप्तऋषी एकत्र जमलले असताना सूर्याचा पहिला किरण, चैत्राच्या पहिल्या दिवशी चक्रेश्वरीवर पडला. हा क्षण ज्योतिषींसाठी नववर्षाची सुरुवात आणि सप्तर्षी युगाची सुरुवात अशी मान्यता आहे. राम नवरेह च्या पूर्व संध्येला कुटुंबाचे कुलगुरू पुढील वर्षासाठी एक धार्मिक पंचाग व स्थानिक देवीचा गुंडा देतात. नंतर एका पारंपारिक थाळीत हे पंचांग, हा गुंडा, तांदूळ, वाळलेली व ताजी फुळे, गवत, दही, अक्रोड, पेन, शाई, शाईचे पात्र, सोन्या-चांदीची नाणी, मीठ, भात, गव्हापासून बनवलेला केक आणि ब्रेड इत्यादी ठेऊन त्यावर झाकण ठेवतात. नवरेहच्या दिवशी ते झाकण काढून सगळेजण त्या वस्तूंचे दर्शन घेतात. तांदूळ व नाणी भाकरी व संपत्तीचे प्रतिक अहि. पेन, कागद शिकण्याच्या प्रयत्नांची आठवण, पंचांग बदलत्या काळाचे आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. जीवनात चांगल्या बरोबर वाईट गोष्टीही घडतात. म्हणून कडू औषधी वनस्पती ‘वाई’ अक्रोडबरोबर खातात. थालीमधील वस्तूंचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्ति एक अक्रोड नदीला अर्पण करतो. तसेच मंदिरामधील देवीस तूप घातलेला हळद भात अर्पण करून देवीचा आशीर्वाद घेतात.
मणिपूर मध्ये नविन वर्षाचा पहिला दिवस ज्याला ‘साजिबा नोंगमा पांबा’ किंवा ‘मेइतेई चेहरा ओबा’ असे म्हटले जाते. प्रत्यक्ष सणाऱ्या दिवसाआधी घरात स्वच्छता केली जाते. मणिपूरमध्ये ‘सनमही’ नावाचा मुख्यतः धर्म आहे. हा एक बहुदेववादी धर्म आहे. हे नाव ‘मेईनई’ धर्मामधील सर्वात महत्वाच्या देवतांच्यापैकी एक असलेल्या ‘लेनिंग थौ सनमाही’ याच्या नावावरून घेतले गेले आहे. जसे आपल्याकडे बुद्धिझम, हिंदूझम शब्द आहेत तसेच मणिपूरमध्ये सनमहिझम किंवा लेनिंगथौइझम असा शब्द आहे.