
घरगुती सिलिंडर मधील गॅसचे वजन कमी !
वैध मापन शास्त्र विभागाची धडक कारवाई ; कोरेगाव पार्क व वनाज परिसरात घरगुती सिलिंडर कमी वजनाचे
पुणे : वैध मापन शास्त्र विभाग पुणे शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडर च्या वजनाची तपासणी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत वैध मापन शास्त्र विभागाला कोरेगाव पार्क , कोथरूड वनाज येथे वितरीत होणा-या घरगुती गॅस सिलिंडर त्या प्रमाणित वजनात ( १४.२ किलो ग्रॅम) वजनात तफावत आढले. संबंधित गॅस सिलिंडर वितरकावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वैध मापन शास्त्र विभागाचे सह नियंत्रक विलास पवार यांनी दिली.
पवार म्हणाले , ” शहर व जिल्ह्यात गॅस सिलिंडर चे वजन कमी असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींवरून अचानक गॅस सिलिंडर च्या वजनाची तपासणी मोहिम सुरू केली. या तपासणी मोहिमेत कोरेगाव पार्क व कोथरूड परिसरातील गॅस सिलिंडर च्या वितरकांकडे सिलिंडर मध्ये गॅस कमी आढळले. त्यामुळे त्यांच्यावर दंडाची कारवाई सुरू आहे. ही मोहिम शहर व जिल्ह्यात सुरू राहणार आहे. ”
कारवाई वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक द ग महाजन , ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुदर्शन बनसोडे, दिनेश सोमनाथे, धनश्री तेलंग व अजय जोगदंड यांनी कारवाई केली .
शहरातील सर्वच सिलिंडर वितरकांकडे अपुरे मनुष्यबळ, गॅस सिलिंडरची मोठी संख्या, दिवसभरात जास्तीत जास्त सिलिंडर पोचविण्याचे उद्दिष्ट त्यामुळे सिलिंडर तोलन न करताच ग्राहकांना मिळत आहे. त्यामुळे सिलेंडरमध्ये गॅस किती वजनाचा आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अनेक गॅस वितरकांनी त्यांच्या कार्यालयातील तोलन काटे कपाटात ठेवले आहेत.तर गेली अनेक वर्षांपासून मुद्रांकन व तपासणीच करून घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे.
घरगुती गॅस सिलिंडर च्या मापात पाप !
वितरक अनेक ठिकाणी होम डिलीव्हरी करतात. मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे तोलन उपकरणेच नसल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत. त्यामुळे सिलेंडरमध्ये अचून वजनाचे गॅस असल्याची खात्री देता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर कित्येक ग्राहकांना गॅस सिलेंडर वजन करून घेतले जाते याची माहितीच नाही.
“स्वयंपाकाचा गॅसचे सिलेंडर स्विकारताना त्याचे सील व्यवस्थित असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. सिलेंडर स्विकारण्यापूर्व कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या तोलन उपकरणांवर वजन तपासून पाहणे आवश्यक आहे. रिकाम्या सिलेंडरचे वजन व गॅसचे निव्वळ वजन सिलेंडरवर दर्शविण्यात आलेले असते. पावतीवर दर्शविलेले वजन पडताळून पाहता येते.’’
– विलास पवार , सहनियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग, पुणे
वैधन मापन शास्त्र विभागाच्या कायद्या प्रमाणे तोलन उपकरणांची तपासणी व मुद्रांकन न केल्यास त्यांच्यावर खटला दाखल होऊ शकतो. तसेच वितरकांकडे तोलन यंत्र नसल्यास त्यांच्यावर पाच हजार रूपये दंडाची कारवाई होऊ शकते.मात्र अनेक वितरकांकडील तोलनयंत्र कपाटात ठेवले आहेत. तर अनेकांनी ही तोलन यंत्रांची पडताळणी व मुद्रांकनच करून घेतले नसल्याचे दिसून येत. तर शहरातील गॅस सिलिंडरची संख्या आणि वितरण करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन पाहता प्रत्येक ग्राहकाला सिलिंडर तोलन करून देणे मोठ्या कष्टाचे काम असल्याचे मत वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
गॅस सिलेंडर वजन करून देणे बंधनकारक आहे.
वैधमापन शास्त्र विभागातर्फे विशेष अभियान घेऊन वितरकांकडील तोलन यंत्राची तपासणी केली जाते. सिलेंडरचे वजन करून न दिल्यास ग्राहकांनी नियंत्रण कक्ष 9869691666 या व्हॅाटस्ॲप क्रमाकांवर तक्रारी करण्याचे आवाहान वैधमापन शास्त्र विभागाने केले आहे.