घुंगरू टू ग्लोरी‘ कार्यक्रमातून विलोभनीय कथक नृत्याचे दर्शन !
पुण्यात कथक नृत्यसौंदर्याचा दशकपूर्ती उत्सव
पुणे:’नृत्यास्मि स्कूल ऑफ कथक’ तर्फे आयोजित ‘घुंगरू टू ग्लोरी’ हा कथक नृत्यप्रस्तुतीचा
कार्यक्रम पुण्यात मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या या कार्यक्रमात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक कथक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.’घुंगरू टू ग्लोरी’ या कार्यक्रमाने केवळ आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचे औचित्य साधले नाही, तर ‘नृत्यास्मि’ संस्थेच्या दशकपूर्तीचा विशेष उत्सवही साजरा केला. या निमित्ताने संस्थेच्या गेल्या दहा वर्षांच्या सांस्कृतिक योगदानाचे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सुंदर दर्शन घडले.
पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ कथक नृत्यगुरु पंडिता मनीषा साठे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने विद्यार्थ्यांना विशेष ऊर्जा मिळाली.कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय सरस्वती वंदनेने झाली. यानंतर सादर झालेल्या ‘एकात्मन’ या सामूहिक नृत्यरचनेला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद आणि टाळ्यांचा गजर लाभला.
‘घुंगरू टू ग्लोरी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘नृत्यास्मि स्कूल ऑफ कथक’च्या संस्थापक अदिती कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अनुराधा दिवाण यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या समाप्तीप्रसंगी अदिती कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले. कथक नृत्याच्या परंपरेला पुढे नेत, नव्या पिढीला घडवण्याचे कार्य ‘नृत्यास्मि’ भविष्यातही अविरतपणे करत राहीन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.