चला, जाऊया पक्षांच्या गावा..!!!

Dilip KurhadeEnvironment06/05/2025125 Views

चला, जाऊया पक्षांच्या गावा..!!!*

खरंतर भूतकाळात फक्त ऐकत आलेलो होतो की, आज रोज सकाळ संध्याकाळ दिसणाऱ्या चिमण्या येणाऱ्या काही दिवसात फक्त फोटोतच पाहायला मिळतील.‌ ही गोष्ट तेव्हा काल्पनिक वाटत होती पण सध्या आपण त्याच दिवसात जगत आहोत. मोजून पाच वर्षांपूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात कमीत कमी पाच ते सहा तरी चिमण्या खेळताना दिसत. नाहीच काही तर निदान चिमण्यांचा चिवचिवाट तरी कानावर नक्की पडत असत. दिवसाची सुरुवात पक्ष्यांच्या किलबिलाटानेच होत असायची. पण आता तसं काही दिसत नाही. आजच्या लहान मुलांना मोबाईलवर पक्षांचे व्हिडिओज दाखवून समाधान मानावं लागतंय यासारखे दुर्दैव या पिढीसाठी काय असावं.

आणि ही परिस्थिती फक्त शहरातच आहे असं नाही. हळूहळू ही परिस्थिती गाव आणि खेड्यांकडे सुद्धा वळू लागली आहे.‌ “माणसाने केलेल्या चुका” या विषयावर बोलणारे अनेक होऊन गेले. एका चुकीला रोजच शिक्षा करणं हे काही योग्य नाही. पण कशाचीही कमी नसणाऱ्या पिंपरी चिंचवड मध्ये पक्षांचं गाव सुद्धा आहेच. “बर्ड व्हॅली” हे नाव आधी फक्त ऐकलेलं होतं. आणि त्यावरूनच अंदाज बांधला की, या ठिकाणी पक्षांशिवाय दुसरं पाहायला कायच मिळणार? पण आपण लावलेला अंदाज आणि प्रत्यक्षात समोर येणारी परिस्थिती ही नेहमी वेगळीच असते. आणि तसंच काहीसं माझं याबाबतीतही झालं.

रुपये २०/- मूल्य असणाऱ्या बर्ड व्हॅलीमध्ये कमीत कमी १९४ प्रजातीचे पक्षी आहेत. जसं तुम्ही वाचून अवाक झालात, तसंच मी सुद्धा तिथे गेल्यावर आश्चर्यचकित झालोच होतं. या ठिकाणी फक्त चिमण्याच नव्हे तर किंगफिशर, फ्लेमिंगो, युरोपियन रॉबिन अशा एक नाही अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी या ठिकाणी पाहायला मिळतात. तसंही सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल, मुलाला घेऊन बाहेर फिरायला जावं तरी कुठे. तेव्हा “बर्ड व्हॅली” हे प्रेक्षणीय स्थळ नक्कीच विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालकांसाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्या पक्षांची नावे ही आपण ऐकलेली नसतात ते पक्षी या बर्ड व्हॅलीमध्ये पाहायला मिळतात. त्यांचा रंग, त्यांचा आवाज, त्यांचं राहणीमान या सगळ्यातून निसर्गाची एक वेगळी किमयाच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

या बर्ड व्हॅलीमध्ये फक्त पक्षीच पाहायला मिळतील असं नाही तर विविध आकर्षणे जसे की, लेझर शो सोबतच तलावाची सफर सुद्धा अनुभवायला मिळते. जर कुटुंबासोबत एका दिवसाची छोटीशी ट्रीप करायची असेल तर बर्ड व्हॅली हा घरापासून अगदी काही अंतर दूर असलेला पर्याय नक्कीच प्रथम क्रमांकावर ठेवायला हवाच. कारण या ट्रिपमध्ये विविध पक्षांची नुसती तोंड ओळखच नाही तर त्या पक्षांचा अनुभव घ्यायला मिळेल. म्हणून उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानातून काही क्षणांसाठी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि काँक्रीट जंगलातून बाहेर येऊन निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घेण्यासाठी एकदा नक्की बर्ड व्हॅलीला भेट दिलीच पाहिजे.

स्वप्निल अनंत काळे
प्रतिनिधी,‌ दैनिक महामेट्रो

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...