छंद गणित, ध्यास गणित : अरुण कांबळे गुरुजी
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक,वाकड,पुणे स्थित अरुण कांबळे गुरुजी म्हणजे आयुष्यभर गणित विषयाचा ध्यास घेतलेले वृतस्थ व्यक्तिमत्त्व.महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात वेगळाच ठसा उमटविणारे शिक्षक. साधी राहणी व उच्च विचारसरणी आत्मसात केलेले गुरु. आई पार्वती व वडील महादेव यांच्या शिक्षणावरच्या प्रेरणेने शिक्षण पूर्ण करून गणित विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये वाढावी म्हणून अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले.गणित तसा अवघड वाटणारा विषय ; पण मनोरंजनाची जोड देऊन विद्यार्थ्यांना गणित समजावून देणे यासाठी त्यांनी काम केले.गणित साक्षरता समाजात आली तर व्यवहारात निश्चित उपयोग होतो हे त्यांनी बिंबवले.
‘ गणित गट्टी ‘ नावाचा गृप त्यांनी तयार केला आहे.महाराष्ट्रातील २७५ पेक्षा अधिक जण या ग्रुपमध्ये आहैत. या ग्रुपवर रोज एक गणिताचा प्रश्न दिला जातो.बुद्धीला चालना देणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या दिवशी दिले जात.अनेक सदस्य ते गणित सोडवितात.या समूहात गणित प्रेमी,शिक्षक, तसेच गणिताची आवड असलेले विद्यार्थी देखील आहेत.यातील शिक्षक आपापल्या शाळेत ही उदाहरणे सोडवून घेत असतात. अनेक जण उत्तरे स्पष्टीकरणासह देत असतात
त्यामुळे इतर सदस्यांना गणित सोडविण्याच्या वेगवेगळ्या रिती, क्लृप्ती, नियम, सूत्र समजून घेता येतात. नुकतेच या प्रश्नांची एक हजार संख्या पूर्ण झाली आहे. एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते; पण एक हजार दिवस तो नियमित राबविणे अवघड असते.या एक हजार दिवसात कधीही खाडा झाला नाही. कांबळे गुरुजींनी ही किमया यशस्वी केली आहे.या ग्रुपशिवाय महाराष्ट्रातील शिक्षकांचा व विचारवंतांचा ‘ सुप्रभात ‘ हा ग्रुप आहे.रोज नियमित दिनविशेष व चांगल्या विचारांची पेरणी करण्यासाठी सरांनी हा ग्रुप केला आहे. रोज पहाटे पाच वाजताच कांबळे गुरुजी दिनविशेष व सुविचार ग्रुपवर टाकतात. या ग्रुपचे वैशिष्ट्य असे की कोणीही राजकीय तसेच समाजात दुही पसरविणारे मेसेज टाकत नाहीत ; तर चांगल्या विचारांची पेरणी करतात. काहीजण कथा टाकतात ; तर काही कविता टाकतात.या ग्रुपमध्ये विविध लेखक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आहेत.३०० हुन अधिक सदस्य असलेल्या या ग्रुपवर ही लेखकांनी लिहिलेले सुंदर लेख ,सकारात्मक बातम्या तसेच महापुरुषांचे विचार टाकले जातात.
विविध वर्तमानपत्रात आलेले गणिताविषयी लेख,कोडी,गणितातील गमती जमती,विविध संख्यांची वैशिष्ट्ये, गणित तज्ञांची चरित्रे, गणितातील वेगवेगळे प्रयोग, शोध यांचा प्रचंड साठा सरांनी केला आहे.अनेक चिकटवह्या त्यांच्या संग्रही आहेत.सरांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर विराजमान आहेत.विद्यार्थ्यांना गणिताविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने कांबळे गुरुजींनी ‘ गणित गट्टी ‘ नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात विविध गणित संख्यांच्या करामती,नऊ ची नवलाई, विविध गणिती जादू,विविध गणित खेल तसेच भारतीय गणिती रामानुजन यांचा परिचय लिहिला आहे.सर गणितावरील हे पुस्तक या नवीन वर्षात प्रकाशित करीत आहेत.पैसे कमविणे हा उद्देश नसून पुस्तके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सर प्रयत्न करीत आहेत.
गणिताविषयी ध्यास घेतलेले,सेवानिवृत्ती नंतरही न थकता आजही दिवसभर गणिताचाच विचार करणारे,गणिताविषयी समाजात जागृती निर्माण करणारे आदरणीय अरुण कांबळे गुरुजी म्हणूनच कायम आठवणीत राहणारे व्यक्तिमत्त्व आहेत.गुरुजींना त्यांच्या गणित प्रसाराच्या कामासाठी खूप शुभेच्छा!
श्री. सुदाम कृष्णाजी विश्वे,
( सेवानिवृत्त कलाशिक्षक )
पुणे – ४११०२१.
मोबाइल नंबर – ९८६०५८६१४७.