युपीएससी यशस्वी विद्यार्थ्यांचा ‘अभिनंदन सोहळा’ उत्साहात !
‘स्वच्छ व कार्यक्षम, कार्यकर्ता -अधिकारी’ होण्याचा यशस्वी विद्यार्थ्यांचा संकल्प
जागतिक राजकारणात भारताने स्वबळावर उभे राहावे: धर्माधिकारी
पुणे: ‘चाणक्य मंडल परिवार’तर्फे आयोजित युपीएससी २०२४ परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ‘अभिनंदन सोहळा’ शनिवारी पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाच्या प्रवासाचे अनुभव उपस्थितांसमोर शेअर केले. ‘स्वच्छ व कार्यक्षम, कार्यकर्ता अधिकारी’ होण्याचा संकल्पही यशस्वी विद्यार्थ्यांनी सर्वांच्या साक्षीने केला.या कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी आणि संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी ‘भारत आणि जग: पहलगाम, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. कार्यक्रमाला निवृत्त एअर व्हाईस मार्शल किरण पळसुले, निवृत्त पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित, निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन, निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, निवृत्त पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पूर्णा धर्माधिकारी,संतोष दास्ताने , स्वप्नील मुंगळे, मयूर पाटील, रोहिणी गुट्टे आदी मान्यवर विशेष करून उपस्थित होते. सिद्धार्थ धर्माधिकारी आणि रेणू गोरे यांनी सूत्र संचालन केले.
‘युपीएससी तील नोकरी ही लोकसेवा आहे. ती लोकसेवा करण्यासाठी म्हणूनच स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी व्हावे.देशाचा कार्यकर्ता होण्यासाठी प्रशासनात अधिकारी व्हावे.अमृतमहोत्सवी भारताची आगामी २५ वर्षे अत्यंत महत्वाची वर्षे आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांनी भारताच्या इतिहासाची नवी सोनेरी पाने स्वकर्तृत्वाने लिहावीत’, असे आवाहन अविनाश धर्माधिकारी यांनी त्यांच्या भाषणात केले.ते म्हणाले,’जगाचे भले करणारी महाशक्ती म्हणून भारत उदयास येत आहे. परदेश धोरणाच्या दृष्टीने आपण सर्वात अवघड काळातून जात आहोत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान स्वतःहून चार तुकडे होण्याकडे वाटचाल करीत आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताकडे येईल, उरलेल्या पाकचे चार तुकडे होतील.अण्वस्त्रांची धमकी ऐकून घेऊन भारत आता गप्प बसणार नाही.
विद्यार्थ्यांनी उलगडली प्रेरणादायी कहाणी !
कार्यक्रमात सहभागी झालेल्या यूपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी परीक्षेतील आव्हाने, त्यांच्या तयारीची रणनीती आणि प्रेरणादायी प्रसंग यावर प्रकाश टाकला. ‘स्वच्छ व कार्यक्षम, कार्यकर्ता अधिकारी’ होण्याचा संकल्पही त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या अनुभवाने उपस्थितांमध्ये नव्या प्रेरणेला चालना मिळाली.‘ग्रामीण पार्श्वभूमी,गरिबीचा न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षा तयारी साठी परिश्रम घेतले.काही वेळा अपयश आले,तरी हिम्मत न हारता तयारी करीत राहिलो . त्यामुळे यशाचा मार्ग सापडला’ असे मनोगत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या यूपीएससीच्या २०२४ च्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अवधीजा गुप्ता (जबलपूर, मध्यप्रदेश) – भारतात ४३ वी रँक,ऐश्वर्या जाधव(नाशिक )- १६१ वी रँक,कृष्णा पाटील(लातूर)- १९७ वी रँक,पंकज पाटले(गोंदिया)- ३२९ वी रँक,रोहन पिंगळे (पुणे )- ५८१ वी रँक, दिलीपकुमार देसाई(कोल्हापूर) ६०५ वी रँक,पंकज औटे(बीड)- ६५३ वी रँक,कपिल नलावडे (सातारा)- ६६२ वी रँक,नम्रता ठाकरे(नागपूर) – ६७१ वी रँक, नितीन बोडके(जालना)- ६७७ वी रँक, ज्ञानेश्वर मुखेकर(अहिल्यानगर)- ७०७ वी रँक, अभिजित अहेर (अहिल्यानगर)- ७३४ वी रँक, श्रीतेश पटेल(धुळे)- ७४६ वी रँक,मोहिनी खंदारे(यवतमाळ) – ८४४ वी रँक ,तनिष्क गेडाम रँक ५३१ यांचा समावेश होता.