जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य
संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे.
भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. संत परंपरेमुळे, त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
वारीत स्वयंशिस्त असते, वारी करणाऱ्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो. गितेतला विचार वारीद्वारे रुजविण्याचा प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी गितेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाविताना ज्ञानेश्वरी ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आला, असेही फडणवीस म्हणाले. अशा अध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.