तीन पिढ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या – संचालक राजेंद्र पवार

विद्युत सुरक्षा सप्ताह अंतर्गत कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी ऑनलाइन खुल्या प्रश्नमंजूषा पोर्टलचे उद्घाटन महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे उपस्थित होते.

तीन पिढ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेला

सर्वोच्च प्राधान्य द्या – संचालक श्री. राजेंद्र पवार

महावितरणच्या ऑनलाइन खुल्या प्रश्नमंजूषा पोर्टलचे उद्घाटन

पुणे: वीज दिसत नाही व अजाणताही दुर्लक्ष झाले तरी माफ करत नाही. विद्युत अपघातात कर्मचारी किंवा कमावत्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्यांच्या तीन पिढ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी किंवा नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत कायम सतर्क राहावे. विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन)  राजेंद्र पवार यांनी केले.

महावितरणच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी ऑनलाइन खुल्या प्रश्नमंजूषा पोर्टलचे उद्घाटन संचालक  राजेंद्र पवार यांच्याहस्ते रविवारी चिंचवड  येथे झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे प्रादेशिक संचालक  भुजंग खंदारे, मुख्य अभियंता  सुनील काकडे यांची उपस्थिती होती.

संचालक  राजेंद्र पवार म्हणाले की, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांनी राज्यभरात विद्युत सुरक्षेची जनजागरण मोहीम सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात ‘शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय घेऊन विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात महावितरणचे कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाइटवर ऑनलाइन खुली प्रश्नमंजूषा सुरू करण्यात आली आहे. विद्युत सुरक्षेबाबत अचूक उत्तरे देणाऱ्यांच्या नावे ऑनलाइन प्रमाणपत्र लगेचच मिळणार आहे.

अत्यंत धकाधकीच्या सेवा क्षेत्रात काम करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघाताचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांना वीजसाक्षर करावे. त्यासाठी सातत्याने स्थानिक उपक्रम राबवा व नागरिकांशी संवाद साधा असे आवाहन संचालक  राजेंद्र पवार यांनी केले.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, अमित कुलकर्णी यांच्यासह अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

खुल्या प्रश्नमंजूषेला राज्यातून मोठा प्रतिसाद – महावितरणचे कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी सुरु केलेल्या विदयुत सुरक्षेच्या ऑनलाइन प्रश्नमंजूषेत रविवारी  सायंकाळपर्यंत तब्बल ५४ हजार ६५९ कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला असून त्यांनी ऑनलाइन प्रमाणपत्रही मिळवले आहेत.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...