देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला                                                –उपमुख्यमंत्री अजित पवार

देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला  – उपमुख्यमंत्री अजित पवार

            पुणे :- “जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केले. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, “डॉ. जयंत नारळीकर जागतिक किर्तीचे वैज्ञानिक तसेच विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे कार्यशील विचारवंत होते. भौतिकविज्ञान, खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे. वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांमध्ये ते आदरस्थानी होते. ‘क्वासी स्टेडी स्टेट थिअरी’संदर्भातील त्यांचं संशोधन मैलाचं दगड ठरलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेला विज्ञानवादी दृष्टीकोन, अंधश्रद्धेवरचा प्रहार कायम स्मरणात राहील. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’सारख्या मानसन्मानाने गौरवान्वित डॉ. जयंत नारळीकरांचं निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांनी सुरु केलेले विज्ञानप्रसाराचे कार्य पुढे सुरु ठेवणे, विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात, विशेष करुन भावी पिढीमध्ये रुजवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...