
धानोरी लोहगाव रेसिडेंट्स अससोसिएशनचे मूलभूत सोयीसुविधांसाठी निषेध आंदोलन
पुणे : धानोरी येथील भारत माता रस्त्यावर “धानोरी लोहगाव रेसिडेंट्स अससोसिएशनचे ” निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे आंदोलन शांततेच्या व लोकशाही मार्गाने पार पडले. अध्यक्ष गिरीश जैवळ यांच्या अध्यक्षतेखाली या आंदोलनात स्थानिक रहिवाशांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येत सक्रिय सहभाग नोंदवला. महिलांचे, जेष्ठ नागरिकांचे व विशेषतः दिव्यांग बांधवांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या लढ्याचे स्वरूप दर्शवणारे ठरले. सहभागी नागरिकांच्या हातात विविध फलक, घोषणा होत्या . या मौन मोर्चा द्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले.
धानोरी आणि लोहगाव हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वेगाने वाढणारे आणि लोकवस्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे परिसर असून देखील, गेल्या अनेक वर्षांपासून येथे पायाभूत नागरी सुविधांचा मोठा अभाव आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, सातत्याने होणारा पाण्याचा तुटवडा, सांडपाण्याची व्यवस्था नसणे , कचर्याचे व्यवस्थापनाचा अभाव, सार्वजनिक वाहतुकीची कमतरता, पथदिव्यांचा अभाव यामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन असह्य बनले असल्याचे गिरीश जैवळ. यांनी सांगितले.
आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हे आंदोलन केवळ एकदिवसीय प्रतीकात्मक निदर्शन न राहता, स्थानिक जनतेचा एकजूट व स्पष्ट संदेश देणारा उपक्रम ठरला. धानोरी व लोहगाव परिसरातील हजारो कुटुंबांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, ही या आंदोलनामागील मुख्य मागणी असल्याचे जैवळ यांनी सांगितले .

या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे उपआयुक्त माधव जगताप यांनी आंदोलनस्थळी येऊन नागरिकांच्या मागण्यांचा आढावा घेतला. त्यांनी सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून येत्या काही दिवसांत संबंधित जमीनमालक, विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि धानोरी लोहगाव रेसिडेंट्स अससोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह बैठक घेण्यात येईल, असे स्पष्टपणे जाहीर केले. या बैठकीत समस्यांचे मुळासकट विश्लेषण करून ठोस कृती आराखडा ठरवण्याचा प्रशासनाचा मानस आहे, असे त्यांनी नमूद केले.
धानोरी लोहगाव रेसिडेंट्स अससोसिएशन ही नागरी प्रश्नांबाबत जागरूक आणि सक्रिय भूमिका घेत आलेली संस्था असून, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि जीवनमान उंचावण्यासाठी असोसिएशनने भविष्यातही कायदेशीर आणि शांततामय मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.<script async