
नागरी संरक्षण दल
भारतीय सैन्यदल म्हणजेच आर्मी,एअर फोर्स, नेव्ही युद्धात देशाचे रक्षण करीत असतेच ; पण शांततेच्या काळात ही सैन्यदल महत्वाची भूमिका पार पाडत असते.भूकंप,पूर,मोठे अपघात अशा निसर्ग निर्मित आपत्तीत तसेच देशाच्या दुष्मनांनी जाणीवपूर्वक केलेला घातपात अशा अनेक ठिकाणी सैन्यदल नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी कधीही तयार असते.म्हणूनच सैन्यदल नेहमी सज्ज असावे लागते त्यादृष्टीने त्यांचा नियमित सराव होत असतो.आपल्या सैन्यदलाची शिस्त पाहून इतर देशातील प्रमुख देखील प्रभावित होतात.स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी आपल्या सैन्याची ताकद जगाला अचंबित करते.सैन्यदला बरोबरच इतरही अनेक संघटना भारतीय सैन्यदलाला पूरक भूमिका बजावीत असतात.
त्यापैकीच एक म्हणजे ‘ नागरी संरक्षण दल’ होय. ‘ नागरी संरक्षण दल ‘ ही संघटना शांततेच्या काळात काम करतेच ; तथापि प्रत्यक्ष युद्धाचा काळातही महत्वाची भूमिका बजावते.प्रत्येक जिल्ह्यात नागरी संरक्षण दल अस्तित्वात असते.याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काम पहात असतात.प्रत्येक जिल्ह्यात नागरी संरक्षण दलाचे मुख्यालय असते.नागरी संरक्षण दलाचे काही अधिकारी, व कर्मचाऱ्यांबरोबरच मानधन तत्वावर स्वयंसेवक असतात.हे स्वयंसेवक आपापल्या भागत कार्यरत असतात. यांचे मुख्य कार्य शांतता, वाहतूक, गर्दीचे नियंत्रण, आपत्कालीन संकटात मदत,प्रथमोपचार आदी कामे असतात. नागरी संरक्षण दलाची अनेक प्रशिक्षण शिबीरे नियमित होत असतात.बेसिक, ऍडव्हान्स अशी शिबिरे होतात.दहा दहा दिवसांच्या शिबिरात प्रथमोपचार,संकटातून सुटका,आग विझविण्याची तयारी,उंच शिडीवरून एखाद्या व्यक्तीची सुटका करणे,आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचे रक्षण कसे करावे,प्राप्त परिस्थितीत जवळपास आढळणाऱ्या वस्तूंचा उदा.दोरखंड,विजेरी यांचा उपयोग करून संकटग्रस्त लोकांना दिलासा देणे, संचलन करणे,आज्ञा पाळणे अशा सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. युद्ध प्रसंगी भोंगा वाजल्यावर आपले प्राण वाचवण्यासाठी कुठे आश्रय घ्यावा,ब्लॅक आउट झाल्यावर घरातील सर्व दिवे घालवून शत्रूच्या विमानांची दिशाभूल करणे हे सर्व प्रशिक्षणात शिकविले जाते.हे स्वयंसेवक नागरिकांना मार्गदर्शन करतातच ; शिवाय नागरिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आपल्या कृतीतून दाखवून देतात.युद्धप्रसंगी तयारी असू द्यावी यासाठी ते शांततेच्या काळातही तयार असतात.१९७२ च्या काळात नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.पुण्यात नागरी संरक्षण दलाचे मुख्य कार्यालय साप्रस येथे आहे.तसेच पर्वती येथे देखील प्रशिक्षण केंद्र आहे.पूर्वी शहरात अनेक भोंगे होते.हे सर्व भोंगे सकाळी साडेदहाला वाजत.भोंगे वाजण्याच्या विविध पद्धती आहेत.सलग एक लयीत भोंगा वाजला तर सर्व आलबेल आहे.सायरन सारखा भोंगा वाजला तर काहीतरी संकट आले आहे हे ओळखून कृती करायची असते.परिसर मोकळा करणे,योग्य ठिकाणी लपणे आवश्यक असते. हे भोंगे एकाच वेळेस वाजत.तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे आता ही यंत्रणा कालबाह्य झाली आहे. नवीन तंत्रज्ञानाचे भोंगे ही काळाची गरज आहे.नागरिकांनाही युद्धप्रसंगी काय करायला हवे हे आता पुन्हा सांगायची वेळ आली आहे. नागरी संरक्षण दलाचे अद्यावतीकरण करणे आवश्यक झाले आहे.स्वयंसेवकांना पुरेशे मानधन देऊन त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करून घेतला पाहिजे. सैन्यदलाइतकेच महत्वाचे असलेले नागरी संरक्षण दल सुसज्ज ठेवणे क्रमप्राप्त आहे.
श्री.सुदाम कृष्णाजी विश्वे,
( निवृत्त कलाशिक्षक )
पुणे: ४११०२१.
मोबाईल नंबर : ९८६०५८६१४७.