परिवर्तनासाठीची सुरुवात स्वतःपासून करा- पोलीस उपायुक्त सोमय मुंडे

परिवर्तनासाठीची सुरुवात स्वतःपासून करा- पोलीस उपायुक्त सोमय मुंडे

 विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी पुणे पोलीस आणि सामाजिक संस्थाचा पुढाकार

पुणे – समाजातील प्रत्येक व्यक्तीने किमान स्वतः सुधारण्याचा प्रयत्न केला तरी आपोआप पर्यायाने त्या कुटुंबाचा आणि समाजाचा उत्कर्ष होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत व्यसनांच्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्यास समाजातील वाढती व्यसनाधीनता तसेच बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. परंतु या परिवर्तनासाठीची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल असे मत परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी व्यक्त केले.

निर्भय विद्यार्थी अभियान व पोलीस उपायुक्त परिमंडळ 7 यांच्या संयुक्त विद्यमाने विधि संघर्ष ग्रस्त बालक व त्यांच्या पालकांसाठी ”  गुन्हेगारी आणि व्यसनमुक्ती” याविषयी आयोजित जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या महत्वपूर्ण गंभीर सामाजिक विषयासाठी आगामी काळात पुणे पोलीस व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नियोजनबद्ध पुनर्वसन कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर, खराडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त  प्रांजली सोनवणे, परिवर्तन संस्थेच्या समुपदेशिका रेश्मा कचरे, निर्भय विद्यार्थी अभियानचे संस्थापक सदस्य निखिल गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक निलेश बडाख, पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे उपस्थित होते.
या कार्यशाळेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक नीरज शेवडे यांनी स्व – अनुभवातून शालेय जीवनात स्वतःची व्यसनामुळे झालेली दुर्दशा, गुन्हे त्यामुळे झालेली स्वतःची आणि कुटुंबाची वाताहत याचे कथन उपस्थित समोर केले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र च्या माध्यमातून व्यसनावर मात करून एक आदर्श व्यक्ती म्हणून आज व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सन्मानाने कार्य करत असल्याची माहिती यावेळी दिली.

डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आगामी काळात विधी संघर्षग्रस्त बालकांच्या व्यसनमुक्तीसाठी मोफत उपचार करणार असल्याचे यावेळी सांगितले. परिवर्तन संस्थेच्या रेश्मा कचरे यांनी मानसिक आरोग्य त्यामध्ये होणारे बदल आणि नैराश्यातून घडणारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे किंवा आत्महत्यांसारखे प्रकार रोखण्यासाठी उपक्रमात सहभागी होऊन पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.सहाय्यक पोलीस आयुक्त  प्रांजली सोनवणे यांनी विधी संघर्ष ग्रस्त बालके आणि पालक यांनी कायद्याचे पालन करून स्वतःच्या प्रगतीसाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

आगामी काळात पुणे पोलिसांच्या मदतीने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र परिवर्तन संस्था व निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या माध्यमातून विधी संघर्ष ग्रस्त बालकांच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेशक नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे निखिल गायकवाड यांनी सांगितले. या उपक्रमात परिमंडळ सात विभागातील सुमारे 100 पेक्षा अधिक विधी संघर्षग्रस्त बालक व त्यांचे पालक यांनी सहभाग घेतला.

सूत्रसंचालन व आभार पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...