“त्यांच्या” शिक्षणासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे – सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इकोनेट आणि ज्योतिबा सावित्री फाउंडेशनच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे पारधी समाजातील या मुलांकडे जन्माचा दाखला आणि आधारकार्ड नसल्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून ही बालके दूर जात आहेत. त्यामुळे या महत्त्वपूर्ण समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
१५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होत असल्याने, त्यापूर्वी या मुलांकडे जन्माचा पुरावा आणि आधारकार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. नागरिकत्वाचा पुरावा नसल्याने या मुलांचे भयंकर शैक्षणिक नुकसान होत आहे.
या गंभीर समस्येकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ज्योतिबा -सावित्री फाउंडेशनचे संचालक सुदर्शन चखाले, तसेच ऍड. शारदाताई वाडेकर,ऍड. मोहन वाडेकर, ऍड. परिसर मोडेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, आधारकार्ड आणि जन्माच्या पुराव्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना झाल्यास पारधी समाजातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळण्यास नक्कीच मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.