पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र – विज्ञानाच्या जादूचं दर्शन घडवणारी वास्तू*

पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र - विज्ञानाच्या जादूचं दर्शन घडवणारी वास्तू*

पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र – विज्ञानाच्या जादूचं दर्शन घडवणारी वास्तू*

जेव्हा एखाद्या विज्ञानप्रेमी व्यक्तीच्या कानावर पिंपरी-चिंचवड हे नाव पडतं तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एकच इमारत उभी राहते आणि ती म्हणजे पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्राची. विज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जिच्यामुळे आपण अनेक वेळा आश्चर्यचकित होतो. अगदी नुकतंच बोलू लागलेल्या लहान बाळाला सुद्धा या विज्ञानामुळे अनेक प्रश्न पडतात.‌ “हे आकाश नीळंच का असतं?” “हे झाड हिरव्या रंगाचंच का आहे?” असे एक ना अनेक प्रश्न त्या लहान बाळाच्या मनात घर करतात. आणि जर त्या प्रश्नाची योग्य उत्तरे त्याला मिळाली नाहीत की तो स्वतःच ती शोधू लागतो. पण अनेक वेळा कंटाळलेल्या पालकांकडून त्याला चुकीची उत्तरे दिली जातात. आणि त्यामुळे कुठेतरी त्याच्या आयुष्यात अंधश्रद्धेला जागा मिळते.

असो, आपल्याला त्याच्या मुळात शिरायचं नाही. पण ज्याच्या मनात विज्ञानाला नेहमी श्रेष्ठत्व दिलं जातं, त्याच्या आयुष्यात अंधश्रद्धेला जागा उरत नाही, हे मात्र निश्चितच. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. लहान मुलांना कुठे घेऊन जावं असा प्रश्न उन्हाळा लागला की पालकांना सतावू लागतो.‌ तेव्हा मुलांना घेऊन पिंपरी चिंचवड येथील विज्ञान केंद्रात भेट दिल्यावर त्यांचा हा उन्हाळा नक्कीच काहीसा वेगळा जाईल. कारण तिथे गेल्यावर त्यांच्या मनात घर करून बसलेला प्रश्नांना कुठेतरी उत्तरं मिळतील. आणि त्यांची ही ट्रीप त्यांना काहीतरी शिकवणारी असेल आणि अविस्मरणीय सुद्धा असेल.

८ फेब्रुवारी २०१३ रोजी पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या ७ वर्षांच्या प्रवासात विज्ञान केंद्राने शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. दरवर्षी जागतिक स्तरावर तंत्रज्ञानात भर पडत असल्याकारणाने विज्ञान केंद्रातील तंत्रज्ञानाला अद्ययावत केले जाते. आणि त्यामुळेच विज्ञान केंद्राच्या या वास्तूत दरवर्षी काही ना काही वेगळेपण आपल्याला दिसून येते. पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्राच्या वतीने विज्ञान दिवस, जैवविविधता दिवस, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस अशा विविध उपक्रमांचे आयोजन वर्षभरात केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगितले जाते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिथे गेल्यावर नेमकं काय पाहायला मिळेल तर वैज्ञानिक क्षेत्रातील 3डी शो, खगोलीय सफर यासोबतच अवकाशातील होणारे बदल त्यांना एकाच छताखाली अनुभवायला मिळतील. इतकंच नाही तर वाहनाचे इंजिन कशा पद्धतीने काम करतं हे त्यांना त्यांच्या डोळ्यांनी पाहता येईल आणि यासारखे अनेक जगावेगळे अनुभव मुलांना त्या ठिकाणी अनुभवायला मिळतील. थोडक्यात सांगायचं झालं तर उन्हाळ्याच्या सुट्टीतही त्यांना काहीच न शिकवता त्यांचा वैज्ञानिक पाया अधिक मजबूत करता येईल.

नक्कीच आता तुम्ही विचार करत असाल की आपणही विज्ञान केंद्राला भेट दिली पाहिजे. पण प्रश्न पडतोच की त्या ठिकाणचे प्रवेश मूल्य किती असेल आणि वेळ काय असेल तर लहान मुलांसाठी रु ७०/- तर मोठ्यांसाठी रु १२०/- इतके तिकीट मूल्य आहे. विज्ञान केंद्राची वेळ ही सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते परंतु सोमवारी मात्र पर्यटकांसाठी विज्ञान केंद्र बंद असते. ऑटो क्लस्टर जवळ असणाऱ्या पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्राला आपल्या मुलांसोबत न उलगडलेल्या सवालांना सोबत घेत एकदा जरूर भेट द्यावी.

स्वप्निल अनंत काळे
प्रतिनिधी, दैनिक महामेट्रो

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...