पोलीस उपनिरीक्षक तानाजी (बुवा) कांबळे सेवानिवृत्त
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक तानाजी (बुवा) बबन कांबळे हे पोलीस दलातील सेवा यशस्वीपणे पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. गुन्हे शाखेसह पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावत असताना गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिताफिने उघडकीस आणले. त्यांच्या या गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी आजवर त्यांना पोलीस दलाकडून 250 हून अधिक बक्षिसे मिळालेली आहेत.
तानाजी कांबळे हे 1990 रोजी पुणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. पोलीस आयुक्तालयासह खडक, येरवडा, विमानतळ,खडकी, गुन्हे शाखा, मुख्यालय या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. या कालावधीत दिवेआगार गणेश मंदिरातील मूर्तीचे दागिन्यांच्या चोरीचा गंभीर गुन्हा त्यांनी शिताफीने उघडकीस आणला. यासोबतच विविध घरफोड्या, दरोडे, खून, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे देखील उघडकीस आणले. घरफोडी तसेच सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणून मोठ्या प्रमाणावर सोने चांदीचे दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादी यांना मिळवून दिला. पुण्यातील सराईत बंटी- बबली टोळीला पकडून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने हस्तगत केले. नयना पुजारी खून खटला तसेच डॉ.नरेंद्र दाभोळकर खून खटला या तपासामध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. राज्यातील तसेच आंतरराज्य स्तरावरील अनेक गुन्हेगार तसेच टोळ्या यांना जेरबंद केले. पुणे शहर पोलीस दलातील अनेक मातब्बर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेवा बजावली. पोलीस दलातील अत्यंत लोकप्रिय, कर्तव्यदक्ष व शिस्तबद्ध व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. इंदापूर जिल्ह्यातील कळस गावचे तानाजी कांबळे यांचा नातेवाईक व मित्रपरिवार अत्यंत मोठा आहे. पत्नी व दोन उच्चशिक्षित मुले यांच्यासह त्यांचा विविध सामाजिक उपक्रमात सातत्याने सहभाग असतो. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी व त्यांच्या पत्नी यांनी देहदान करण्याचा निर्णय घेऊन समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे. ३५ वर्षाची पोलीस दलातील प्रदीर्घ सेवा पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले. सेवापूर्ती निमित्त पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पोलीस दलातील आजी-माजी अधिकारी मित्रपरिवार व सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील त्यांचा सन्मान केला.