प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा थोरले बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून
-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे: संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश पुढे राहील हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे, यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनचरित्रातून मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल धीरज शेठ, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे आदी उपस्थित होते.
शाह म्हणाले, थोरल्या बाजीरावांनी तंजावर ते अफगाणीस्तानपर्यंत आणि अफगाणीस्तान ते बंगालमार्गे कटकपर्यंत एका मोठ्या हिंदवी साम्राज्याची स्थापना केली जे छत्रपती शिवरायांचे स्वप्न होते. बाजीरावांनी युद्ध नियोजनातील वेग, रणकौशल्य, रणनीती आणि वीर सोबत्यांच्या साथीने अनेक पराभवांना विजयात रुपांतरीत केले. पालखेडच्या विजयाचा अभ्यास बारकाईने केल्यास हा अकल्पनीय होता हे लक्षात येईल. गुलामीचे निशाण आहे तिथे उध्वस्त करुन स्वातंत्र्याचा दीप लावण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. देश विदेशातील अनेक युद्धकौशल्यातील अभ्यासू सेनानींनी त्यांच्या युद्धकौशल्याविषयी गौरविले आहे.
युद्धनीतीचे काही नियम हे कधीच कालबाह्य होत नाहीत. त्यात व्यूहरचना, वेग, सैन्याची समर्पण भावना, देशभक्ती आणि बलिदान भाव सैन्याला विजय मिळवून देतो. गेल्या पाचशे वर्षातील या सर्व गुणांचे उत्कृष्ट उदाहरण थोरले बाजीराव पेशवे आहेत. त्यांनी त्यांच्या २० वर्षाच्या काळात मृत्यूपर्यंत लढलेली सर्व ४१ युद्धे जिंकली, असेही गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांच्या मदतीने जनतेला एक करून मुघल साम्राज्याच्या चारही आक्रमकांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी फुलाविलेल्या स्वराज्याच्या अंगारामुळे अनेक पराक्रमी योद्धे तयार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास आहे.
त्यांनी लढलेल्या ४१ लढायापैकी एकही लढाईत पराभव स्वीकारला नाही. उत्तरेला काबूलपर्यंत आणि पूर्वेला बंगालपर्यंत मराठी साम्राज्यचा विस्तार करण्याचे काम थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केले. वेग ही त्यांची सर्वात मोठी रणनीती होती. युद्धासाठी मुघलांची सेना जेव्हा ८ ते १० कि.मी. प्रवास करत तेव्हा बाजीरावांची सेना ६० ते ८० कि.मी. चा प्रवास दररोज करत. पालखेड येथे झालेल्या युद्धाचा उल्लेख रणनितीनुसार सर्वात चांगली लढाई होय असा माँटगोमेरी यांच्यासारख्या सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्याचा गौरव केला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.