प्रा. किरणकुमार जोहरे यांच्या एआय संशोधनाला पुरस्कार
मविप्र संस्थेतर्फे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते सन्मान
नाशिक: मविप्र कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत, नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्राध्यापक किरणकुमार जोहरे यांच्या “एआय@2047: भारताच्या $50 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा सक्षम प्रवास” या रिसर्च पेपरला आयएमआरटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) राष्ट्रीय परिषदेत “सर्वोत्कृष्ट नवसंशोधन रिसर्च पेपर सादरीकरण पुरस्कार” मिळाला. 50 हून अधिक संशोधन रिसर्च पेपरमधून प्राध्यापक गटात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या या रिसर्च पेपर एआय च्या माध्यमातून भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी ठोस उपाययोजनांचा कृती आराखडा मांडण्यात आला आहे. प्रा. किरणकुमार जोहरे यांचे एआय संशोधन आणि शेतकऱ्यांसाठीच्या सेवांनी भारताला जागतिक आर्थिक आणि कृषी महासत्ता बनवण्याचा मार्ग आहे. त्यांचे कार्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह देशाच्या पन्नास ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला गती देईल. मविप्रच्या आयएमआरटी आणि एआयएमएस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही दोन दिवसीय नववी एआय राष्ट्रीय परिषद गंगापूर रोड, नाशिक येथे झाली, जिथे एआय च्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांवर चर्चा झाली.
मविप्र संस्थेकडून सन्मान
मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाजाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी ग्रंथ देऊन प्रा. किरणकुमार जोहरे यांचा सत्कार या रिसर्च पेपर पुरस्काराबद्दल केला. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, मविप्र कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. सुरेश जाधव आणि उपप्राचार्य डॉ. दिलीप माळोदे उपस्थित होते. “प्रा. जोहरे यांचे संशोधन भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रेरणादायी आहे व ते मविप्रचे आहेत याचा अभिमानाच आहे” असे अॅड. नितीन ठाकरे यावेळी गौरव करताना म्हणाले.
पुरस्काराबद्दल मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, मविप्र संचालक अॅड. लक्ष्मण लांडगे, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक श्रीमती शोभाताई बोरस्ते, आयएमआरटी संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी, केटीएचएमचे प्राचार्य डॉ. एस एस काळे, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र मोरे, सुनिल पाटील, आयएमआरटी आयक्यूएसी कोऑर्डिनेटर डॉ. संजय गायकवाड, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग प्रमुख व आयक्यूएसी कोऑर्डिनेटर प्रा. भगवान कडलग, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा मनिषा सोनवणे आदींसह संस्थेच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
प्रा. किरणकुमार जोहरे यांना अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियासह १०० देशांमध्ये ढगफुटी तज्ज्ञ म्हणून मान्यता व ओळख प्राप्त झालेली आहे. गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी “अंदाज नव्हे, माहिती” या विनामूल्य, विनाअनुदानित राष्ट्रीय हवामान अलर्ट सेवेद्वारे कोट्यवधी शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती पुरवली आहे. ही सेवा शेतकऱ्यांना पीक नियोजनात मदत करून आर्थिक स्थैर्य प्रदान करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि एडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रा. किरणकुमार जोहरे शेती, राष्ट्रीय उत्पन्न आणि जागतिक अन्नसुरक्षा वाढवण्यासाठी संशोधन करत आहेत.
शेतकऱ्यांसाठी एआय-आधारित हवामान सेवा
प्रा. किरणकुमार जोहरे यांची “अंदाज नव्हे, माहिती” सेवा महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे 2 कोटीपेक्षा जासत शेतकऱ्यांना विनामूल्य हवामान अलर्ट पुरवते. एआय-आधारित अंदाज आणि आयओटी तंत्रज्ञानाद्वारे मान्सून, चक्रीवादळ, ढगफुटी, आणि दुष्काळ यांसारख्या घटनांची तात्काळ माहिती दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी पीक नियोजन सुधारून दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांचे नुकसान टाळले आहे.