‘बाल स्नेही समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

Dilip KurhadeJudiciary01/05/2025123 Views

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. महेंद्र महाजन यांच्या हस्ते 'बाल स्नेही समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  महेंद्र महाजन यांच्या हस्ते ‘बाल स्नेही समुपदेशन केंद्राचे उद्घाटन

पुणे : येरवडा येथे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ‘बाल स्नेही समुपदेशन केंद्रा’चे उद्घाटन  जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महिला व बाल विकास विभाग, पुणे आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव  सोनल पाटील, बाल न्याय मंडळाच्या न्यायदंडाधिकारी गरिमा बागडोदिया, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा बिरारीस, बाल निरीक्षण गृह (येरवडा) चे अधीक्षक गजानन चाटे, तसेच ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’च्या संस्थापिका डॉ. कॅरोलीन दि वाल्टर यांची  उपस्थिती  होती.  पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष बाल पोलीस पथकाचे  अधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व केंद्राच्या उद्घाटनाने झाली. यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी प्रास्ताविक करताना समुपदेशनाच्या दीर्घकालीन गरजेवर भर दिला. त्यांनी सांगितले, “मुलांना समुपदेशन ही केवळ तात्पुरती मदत नसून, दीर्घकालीन आधार हवा असतो. अशा प्रकारचे समुपदेशन त्यांना मजबूत मानसिक स्वास्थ्य प्राप्त करून देऊन, भविष्यात त्यांना जबाबदार व जागरूक नागरिक होण्यास प्रेरित करेल.”
यानंतर  महेंद्र महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात बालकांच्या समुपदेशनाच्या नाजूक गरजेवर प्रभावी प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, “कोणताही बालक जन्मतः गुन्हेगार नसतो. परिस्थिती व सामाजिक अपयशामुळे त्याच्या जीवनाची दिशा बदलते. म्हणूनच अशा मुलांना सहकार्य करणे व त्यांच्याशी ममत्वाने संवाद साधणे अत्यावश्यक आहे. हे समुपदेशन केंद्र बालकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि समजूतदार मंच उपलब्ध करून देईल.”
महाजन यांनी आणखी स्पष्ट केले की, गुन्हेगारीच्या मुळाशी जाऊन जर आपण बालकांच्या मानसिक व भावनिक गरजांकडे लक्ष दिले, तर भविष्यातील प्रौढ गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल. त्यांनी सामाजिक संस्थांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत, ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’च्या कार्याची विशेष स्तुती केली. त्यांनी अभिमानाने नमूद केले की, आतापर्यंतच्या कारकीर्दीत चार बाल स्नेही समुपदेशन केंद्रांची सुरुवात झाली आहे.
महाजन यांनी मागील १५ दिवसांतील मानसिक आरोग्याशी संबंधित गंभीर घटनांचा उल्लेख करत मानसिक स्वास्थ्य क्षेत्रावर काम करण्याची आजची निकड अधोरेखित केली. “मानसिक आरोग्याला तितकेच महत्त्व दिले पाहिजे, जितके आपण शारीरिक आरोग्याला देतो,” असे ते ठामपणे म्हणाले .या उपक्रमामुळे विधी संघर्षग्रस्त बालकांना नव्या उमेदीनं आयुष्य घडवण्याची एक नवी संधी उपलब्ध झाली असून, ‘बाल स्नेही समुपदेशन केंद्रा’च्या माध्यमातून अनेक बालकांना सशक्त, समर्थ व जबाबदार नागरिक घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’चे समन्वयक ऋषिकेश डिंबळे यांनी केले, तर संस्थेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी शकील शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...