
बोगस मृत्यूपत्राव्दारे जमिनीच्या मालकी हक्कासाठी फेरफार नोंदीचा प्रयत्न
डोंगरगाव येथील आठ एकर जागा बळकावण्याचा बॅरीस्टर नातवाचा प्रयत्न असफल
पुणे : कोरेगाव पार्क येथील एका उच्चभ्रू कुटुंबातील बॅरिस्टर असलेला नातू बोगस मृत्यूपत्राव्दारे आजीची कोट्यावधी रूपयांची जागा लाटण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, मंडल अधिकाऱ्याच्या सजगतेमुळे हा प्रयत्न फसला. हवेली तालुक्यातील डोंगरगाव येथील गट क्रमांक ३७५/४ ची जागा पूर्व रिंगरोडसाठी राज्य सरकार ताब्यात घेत आहे. यापैकी आठ एकर जागा बॅरिस्टर असलेल्या रीषभ तालेरा आजीच्या ताब्यात असलेल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार करून स्वत:च्या नावाने जमिन करण्याचा प्रयत्न करीत होता. या संदर्भात आजीने जिल्हाधिकारी, उप परिमंडळ अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांकडे ७/१२ उताऱ्यावर फेरफार करू नये अशी तक्रार केली होती. रिषभ तालेराने सादर केलेले कागदपत्र व मृत्यूपत्र बोगस असल्याचे मंडल अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या फेरफारची नोंद रद्द केले. त्यामुळे वकिल असलेल्या नातवाला दणका बसला आहे.
कोरेगाव पार्क येथील एका उच्चभ्रू कुटुंबातील महिलेने १९९१ मध्ये हवेली तालुक्यातील डोंगरगाव येथील गट क्रमांक ३७५/४ ही आठ एकर जागा भाऊ डॉ. गुलाब बंब यांच्या नावाने खरेदी केली होती. डॉ बंब यांनी २००७ मध्ये खरेदी केलेल्या जागेचे इच्छापत्र( मृत्यूपत्र) तयार केले. या इच्छापत्रात त्यांनी ही जागा बहिणीच्या नातवाच्या मुलांच्या ( पणतू) नावे होईल, असे नमूद केले. या इच्छापत्रात डॉ. बंब यांनी बहिणीच्या नातवंडांची अनुक्रमे रिषभ व वर्धन यांची नावे टाकली. मात्र, त्यावेळी रिषभ व वर्धन विवाहीत नसल्यामुळे त्यांच्या मुलांचा प्रश्नच उद्गवत नव्हता. म्हणून त्यांच्या मुलांचा नावांचा उल्लेख केले नाही तसेच वाक्याच्या पुढे पूर्णविराम पण दिसत नाही त्यामुळे मृत्यूपत्रात वाक्य अर्घवट असल्याचे दिसून येते.
दरम्यान रिषभ हा इंग्लड वरून ‘बॅरीस्टर’ ही पदवी घेऊन भारतात आला. त्यावेळी त्याला आजीच्या नावाने डोंगरगाव येथे आठ एकर जागा रिंगरोडमध्ये गेल्याचे समजतले. ही जागा कोट्यवधी रूपयांची असल्याचे त्याच्या लक्षात आले. ही जागा सहज आपल्याला मिळणार नाही हे त्याच्या लक्षात आल्याने त्याने आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा दुरुपयोग करून इच्छापत्र ताब्यात घेतले. ज्या इच्छापत्रात अनेक त्रुटी आहेत. डॉ. गुलाब बंब यांच्या अंगठ्याची निशाणी नाही. त्यांची सही मिळती जुळती नाही. डॉ. बंब यांच्या मृत्यूनंतर एक वर्षांनी ( २००९ मध्ये) इच्छापत्राची नोंदणी हवेली उपनिबंधक कार्यालय क्रमांक दोन मध्ये करण्यात आली. बोगस इच्छापत्र असल्यामुळे बॅरिस्टर नातवाने ते कोठेचे दाखविले नाही. मात्र, त्याच्या आधारे पंधरा वर्षांनंतर म्हणजे २०२४ मध्ये डोंगरगावचे तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मूळ सात बारा जागेवर फेरफार करण्यास सांगून जमिन स्वत:च्या नावाने करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ७६ वर्षांच्या आजीने केला. त्यांनी तक्रार अर्ज जिल्हाधिकारी सुहास दिवसे व हवेली उप परिमंडळ अधिकारी संजय आसवले, मंडल अधिकारी संदिप झिंगाडे यांच्याकडे केले होते. त्यानंतर मंडळ अधिकारी संदिप झिंगाडे यांनी रिषभ तालेराने दिलेल्या सर्व कागदपत्र व मृत्यूपत्राची सहानिशा केली असता त्याने खोट्या मृत्यूपत्राच्या आधारे फेरफार केल्याचे लक्षात आल्याने झिंगाडे यांनी फेरफार रद्द केले. त्यामुळे वकिल असलेल्या नातवाचे जमिन हडपण्याचा प्रयत्न असफल झाले.
दरम्यान अतिरीक्त जिल्हाधिकारी यांनी बनावट कागद्पत्राला मान्यता दिली मात्र विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाला स्टेटस को दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात ७५ वर्षाच्या आजीला न्याय कधी मिळणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
‘‘ ॲड रिषभ तालेरा याने स्वत: व आपल्या भावाच्या नावे ७-१२ वर नोंद करण्यासाठी गट क्रमांक ३७५/४ वर फेरफार क्रमांक ३९०१ चुकीच्या पद्धतीने टाकून घेतली होती. याची शहानिशा केली असता गुलाब बंब यांचे मृतपत्रच खोटे असल्याचे दिसून येत त्यामुळे फेरफारीवरील ॲड रिषभ तालेरा व त्याच्या भावाचे नाव रद्द करण्यात आली आहेत. ’’
– संदिप झिंगाडे, मंडळ अधिकारी, लोणीकंद
ज्येष्ठ महिलेची वडगावशेरी येथील तीन प्लॉट आमदाराच्या मुलाला विकले
वडगावशेरी येथील सर्वे नं ५१ मधील प्लॉट क्रमांक ५५, ५६ व ६९ हे तीनही प्लॉट कोरेगाव पार्क येथील ज्येष्ठ महिलेच्या मालकीचे होते. ज्येष्ठ महिलेची सून सोना तालेरा व त्यांनी पॉवर ऑफ ॲटर्नी दिलेला त्यांचा मुलगा ॲड रिषभ तालेरा यांनी चक्क ही जागा आमदार प्रकाश सोळंके यांचा मुलगा पृथ्वीराज सोळंके यांना वादातील जागा असल्यामुळे ज्येष्ठ महिलेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासाठी बाजारभावा पेक्षा कमी किमतीत व निम्मे मोबदला घेऊन विकले. याची तक्रार सहा महिन्यापूर्वी ज्येष्ठ महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, नातू , दीर व आमदाराच्या दबाखाली पोलीस ठाण्याने अद्याप तक्रार नोंद केली नाही. त्यामुळे किमान जीवंत असे पर्यंत तरी मला माझी जमिन मिळेल का असा प्रश्न महिलेने विचारला आहे.
या प्रकरणात मी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत . कोणत्याही बोगस इच्छापत्राचा गैर वापर केला नाही.
– वृषभ तालेरा