
भावगर्भित,आशयसंपन्न कवितांचा संग्रह : वनमाला.
कविता म्हणजे भावना,कल्पना आणि यांचा लयबद्ध, अर्थपूर्ण आणि अलंकारिक शब्दात केलेला कलात्मक आविष्कार होय. कविता एक लघुरुप रचना असून जिच्यात छंद, यमक आणि रसात्मकता वापरून मानवी संवेदना प्रभावीपणे व्यक्त केल्या जातात. कवीच्या मनात उमटलेल्या भावनांची अभिव्यक्ती म्हणजे कविता. तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती कधीना कधी कविता करीत असतो. काही प्रकट होतात ; तर काहीजण मनातल्या मनात कविता जगतात. प्रत्येकाचे एक भावविश्व असतं त्या विश्वात आतील बाहेरील घटनांचा पडसाद उमटलेला असतो. भावभावनांचे हे तरंग मग शब्दरूपाने आपोआप बाहेर पडतात आणि त्याची होते कविता.
अर्चना गणेश गोरे या कवयित्रीचा ‘ वनमाला ‘हा भावगर्भित आणि आशयसंपन्न काव्यसंग्रह वाचनात आला. आपल्या आईच्या नावाने प्रसिद्ध केलेल्या या काव्यसंग्रहातील कविता प्रत्येकाला नक्कीच आपल्या वाटतील. हा काव्यसंग्रह त्यांनी विविध विषयांवरील अनेक कवितांनी खुलवला आहे. मनाची अस्वस्थता, तडफड, विरह वेदना या भावना कवितेत प्रभावी उतरल्या आहेत. निसर्ग, प्रेम,पाऊस आशा अनेक विषयांवरील साध्या सोप्या शब्दात सहज पोहचवणाऱ्या अनुभूती देणाऱ्या, मनाचे खेळ टिपणाऱ्या उत्कट आणि उत्स्फूर्त कविता वाचकांना आपल्याशा वाटतात.
आईवर लिहिताना त्या म्हणतात,
कहाणी एका आईची
शब्दात मांडताना
गहिवरून येते मज
आजही आठवताना
जगातील प्रत्येक माणसाच्या मनाचा एक अतिशय संवेदनशील कोपरा ‘ आई ‘ शब्दाने व्यापलेला असतोच ; आणि म्हणूनच ‘ आई ‘ अनेकांच्या कवितेत डोकावतेच कवितासंग्रहाला सुप्रसिद्ध कवी बकुळगंधकार राजन लाखे यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे त्यात ते म्हणतात,’ स्वतःच्या आयुष्याची परिभाषा मांडणारी,जोडीदाराविषयी संवेदनशील भावनिक आत्मीयता असणारी, निसर्गाचा प्रेमाशी अनुबंध जोडणारी, बुरसटलेल्या परंपरेला नाकारणारी, नात्यांची रूपे अलगदपणे उलगडणारी कविता अर्चना गोरे यांनी समर्थपणे सादर केली आहे.त्यांच्या कवितेत
भक्तासाठी उभा ll राजा पंढरीचा
देव ज्ञानियाचा ll विटेवरी
सारखा भक्ती रस आहे. गुरुबद्दल कृतज्ञता आहे.
महाराज तुम्ही होतात म्हणून ताठ आहे मान सारखा विररस आहे. महाराष्ट्र माझा मध्ये महाराष्ट्राची महती आहे, मी तिरंगा बोलतोय मध्ये देशभक्ती आहे ; तर पंचमीचा सण, श्रावण मध्ये सण समारंभ, निसर्ग डोकावतो आहे. अनेक कवितांत स्त्री मनाचा हुंकार आहे. काही कवितेत जोडीदाराविषयी लिहिले आहे. जीवनातील सर्वच घटकांना, प्रसंगाला, सर्वच क्षेत्रांना कवितेतून प्रकट केले आहे ; आणि त्यामुळेच यासंग्रहातील कविता सर्वांनाच आपल्याशा वाटतील. कवीची एखादी रचना ‘ अरे या तर आपल्या मनातील भावना आहेत.’असे वाटल्यास कवी यशस्वी झाला असे समजावे.अर्चना गोरे यांच्या कविता या प्रकारात मोडणाऱ्या आहेत.
अतिशय देखणा असा हा कवितासंग्रह साहित्यसंपदा या प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. विठू माऊली, महाराज तुम्ही होतात म्हणून, मी बोलतोय तिरंगा, निसर्गकाव्य,वेदने पलीकडले अशा अनेक विषयांवरील भाष्य कवितेच्या रूपाने केले आहे. सर्वसामान्य, गृहिणी,अभ्यासक यांना हा काव्यसंग्रह निश्चित आवडेल .
पुस्तकाचे नाव : वनमाला
प्रकार : काव्यसंग्रह
कवयित्री : सौ. अर्चना गणेश गोरे
प्रकाशक : साहित्यसंपदा प्रकाशन
पाने : ११६
मूल्य : १५० रुपये.
श्री. सुदाम कृष्णाजी विश्वे,
( निवृत्त कलाशिक्षक )
पुणे – ४११०२१.
मो नं. – ९८६०५८६१४७.