
मानवतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली पाहिजे
-बी. बी. मेश्राम
१३६ वी वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न.
छत्रपती संभाजीनगर : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन, त्रिरत्न बुद्ध विहार व दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना) च्या संयुक्त विद्यमाने त्रिरत्न बुद्ध विहार, सह्याद्रीनगर येथे “मला धर्म जास्त प्यार आहे आणि त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार आहे.” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त सदरील प्रासंगिक विषयावर १३६ वी वैचारीक प्रबोधनात्मक कार्यशाळा संपन्न झाली.
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे संचालक बी. बी. मेश्राम अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले की, आज आपण १३६ व्या कार्यशाळेत चर्चा करीत असताना आपल्या समाजाची स्थिती ३६ च्या आकडया प्रमाणे झालेली आहे. ज्यामुळे एकाच विचारधारेला माणणारे कार्यकर्ते परस्परांचे तोंड पाहायला तयार नाहीत. समाज जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असे म्हटल्याचा प्रचार केला जातो. मात्र आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ९ मार्च १९२४ ला मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “Educate, Agitate and Organise” अर्थात सुशिक्षित करा, संघर्ष करा आणि संघटित व्हा म्हणजे सुशिक्षित झाल्यावर संघटित होण्यासाठी संघर्ष केला पाहिजे आणि संघटित झाल्यावर हक्क अधिकारासाठी संघर्ष केला पाहिजे असे म्हटले होते. परंतु आपण तसे न केल्यामुळे आपला समाज संघटित होऊ शकलेला नाही. परिणामी संघर्षाला फारसे यश प्राप्त होत नाही. तसेच शिकल्या सवरलेल्या लोकांनी डॉ. आंबेडकरांना धोका दिला आहे, असेही म्हटले जाते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तसे म्हटलेले नाही तर १८ मार्च १९५६ ला आग्र्याच्या रामलीला मैदानावर दिलेल्या भाषणात त्यांनी अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाहने नेणे, सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना व्यापक प्रतिनिधी मिळवून देणे व खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करणे हे त्यांच्या मागील पंचवीस वर्षातील राजकारणाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले होते. याचा प्रचार प्रसार करून शासनकर्ती जमात होण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची आवश्यकता असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदेशाप्रमाणे “ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टु पॉलिटिक्स” चालविण्यासाठी सर्व पक्ष, संघटन, संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत. करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये मला राजकारणापेक्षा धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी माझी सक्ती वेचणार आहे. असे म्हटले होते याची करिता आपण मानवतावादी समाज निर्माण करण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली पाहिजे. याची जाणीव ठेवून फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन निरंतरपणे कार्यरत आहे.
उद्घाटनपर मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आर. बी. बनसोडे म्हणाल्या की, इतिहासात आपली फार वाईट अवस्था होती. आपली परिस्थिती सुधारण्यासाठी भारताचे संविधानात तरतुदी केलेल्या आहेत, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी आपणास दर्जेदार शिक्षण नाकारले जात आहे, करिता आपण जागृत राहिले पाहिजे.
प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. एस. बोरकर म्हणाले की, धम्मासाठी जीवन समर्पित आणि व्यतीत केले पाहिजे. वर्तमानातील धम्माच्या स्थितीला उपासक जबाबदार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला आपणास धम्मचक्र प्रवर्तन दिनी धम्माची दीक्षा दिली. त्यांना सारा भारत बौद्धमय करायचा होता. करिता त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा नारा दिला होता. तर शिकलेल्या लोकांनी मला धोका दिलेला आहे असेही म्हटले होते. करिता आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पक्ष संघटन संस्था चालविल्या पाहिजेत.
याप्रसंगी डॉ. व्ही. एच. कांबळे म्हणाले की, जबाबदार उपासक निर्माण न झाल्याने सर्वत्र धम्माची वाईट स्थिती आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने शिकून तरी काय करायचे? असा विचार करून गरिबा घरची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. मिठूसिंग बहूरे म्हणाले की, बाबासाहेबांना विरोध असताना सुद्धा त्यांनी विपरीत परिस्थितीत कार्य केले आहे. आपण भारताचे संविधानाप्रमाणे समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रमेश खडसे म्हणाले की खाजगीकरणाच्या विरोधात आंदोलने केली पाहिजेत. महादेव डांबरे म्हणाले की विषय धार्मिक वाटत असला तरी याचा संबंध हा समाज व राजकारणाशी आहे. हे भाषण म्हणजे आयुष्यातील संपूर्ण चळवळीचा सारांश आहे. जी. एस. दोडवे म्हणाले की, आवड असेल, तिथे सवड मिळते. तरी सवड काढून कार्यक्रमाला आले पाहिजे. सत्य स्वीकारण्यासाठी असत्य सोडावे लागेल. डॉ. डी. एन. जाधव म्हणाले की, भारतीय बौद्ध महासभेच्या उद्देशावर आपण कार्य केले पाहिजे.
सुरुवातीला आदर्शांना पुष्प अर्पण करून त्रिरत्न बुद्ध विहार समितीच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. पंचशील त्रिसरणाने सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन अॅड. विलास रामटेके तर प्रास्ताविक डॉ. रमेशचंद्र धनेगावकर व आभार महादेव डांबरे यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेला बी. बी. मेश्राम, अॅड. विलास रामटेके, डॉ. व्ही. एच. कांबळे, मिठूसिंग बहूरे, डॉ. रमेशचंद्र धनेगावकर, महादेव डांबरे, जे. बी. हातोले, के. पी. आढाव, आर. बी. बनसोडे, कल्पना अवचरमल, चंद्रकांत मस्के, रमेश खडसे, जी. एस. दोडवे, एस. एस. बोरकर, डॉ. डी. एन. जाधव, व्ही. टी. शिरसाट, प्रा. श्रीमंत कांबळे इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.
(शब्दांकन : बी. बी. मेश्राम, संचालक : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र.)
संपर्क : ८९८३०८२१२८ (Wh), ९४२१६७८६२८ (C)
circumference1968@gmail.com