मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी;

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी;

नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा

– विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

पुणे: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत सर्वच संबंधित विभागांनी समन्वय ठेऊन आपत्तीवर मात करण्यासाठी काम करावे. आपत्तीबाधित नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

 पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते.आगामी काळातही सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची हवामान विभागाची माहिती पाहता महानगरपालिकेने कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करावी. नालेसफाईची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत. पावसादरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचते असे नागरी भाग व झोपडपट्ट्यांची माहिती महानगरपालिकेकडे असते. आपत्तीकाळात व पूरस्थितीमध्ये बाधितांना सुरक्षित जागी हलविण्यासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था करावी.

 निवारा केंद्रात नागरिकांना हलवण्याबाबतचे योग्य नियोजन करावे. त्या ठिकाणी हलविण्यात येणाऱ्या नागरिकांना अन्न, निवास व्यवस्थेसह अंथरून पांघरून आदी सोई- सुविधा व्यवस्थितपणे मिळाल्या पाहिजेत. भविष्यात या नागरिकांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून सर्व ती दक्षता घेण्यात यावी. नागरिकांची घरे, इतर मालमत्ता आदींचे नुकसान झाल्यास महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत तसेच बाधितांना १०० टक्के मदत मिळेल याची दक्षता घ्यावी.

  

आयुक्त सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महानगरपालिकेचा पूर नियंत्रण कक्ष, जलसंपदा विभागाचा कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष 1 जूनपासून 24 तास 7 तास तत्त्वावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग, अग्निशमन बाबत फायर क्रू अशी नवीन संकल्पना सुरू केली आहे. हवामान विभागाचा इशारा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. तात्पुरते निवारा केंद्र निश्चित केली असून असून तेथे आवश्यक त्या सुविधा, अन्न, निवास व्यवस्थेसाठी अंथरूण, पांघरूण पुरविण्याचे नियोजन केले आहे. पूरपरिस्थिती असलेल्या काळात तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतींनी सहकार्य करावे, असे आवाहन   सिंह यांनी केले.

 

आपत्ती व्यवस्थापनासाठी 1 हजार कोटी रुपयांची मागणी केली असून त्यापैकी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून 570 कोटी रुपये पवना नदी पूर शमन उपाययोजनांसाठी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविला आहे. यातून नैसर्गिक नाल्यांचे पुनुरूज्जीवन, पुराच्या धोका कमी करणे, नागरिकांच्या जीविताचे, मालमत्ता तसेच पायाभूत सुविधांचे संरक्षण, पर्जन्यजल वाहिन्या, सांडपाणी वाहिन्यांची सुधारणा करणे तसेच आदी समग्र पूरनियंत्रण उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

 

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...