मिथक कथेतून वास्तवाचा बोध घ्यावा :प्रा.अशोक राणा
गांधी दर्शन शिबीरास चांगला प्रतिसाद
पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित’गांधी दर्शन’ शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर पार पडले.१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा यांनी ‘मिथक चिकित्सा‘,तर लोकसंस्कृतीच्या अभ्यासक स्नेहा टोम्पे यांनी ‘मातृत्वतत्त्वां
प्रा.राणा म्हणाले,’भारत हा पुराणकथात वावरणारा देश आहे.कारण मिथक आणि वास्तव यातील फरक भारतीय जनमानसाला ठाऊक नाही.आपल्या दैनंदिन जीवनात घडणारी मिथके,पुराणकथांशी संबंध जोडून त्यावर आधारित विचारसरणी स्वीकारण्याबद्दल भारतीयांना धन्यता वाटते.त्यातून नीतिबोध घ्यावा,दिशा घ्यावी अशी अपेक्षा असते,पण तसे होत नाही.वास्तवाची दाहकता टाळण्यासाठी कल्पनाविलासाकडे त्याचे मन वळते.चमत्कृतीने नटलेली मिथके जनमानसाचा ठाव घेतात.ही कल्पनांची पुटे बाजूला सारून चिकित्सेला तयार राहिले पाहिजे’.
स्नेहा टोम्पे म्हणाल्या,’भविष्याची बीजे इतिहासात असतात. म्हणून पुराण कथा, मिथक, देवता यावर बोलण्याची गरज असते.पुरातत्विय, राज्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून पाहण्याची गरज आहे.प्रजननक्षमतेमुळे, सृजनक्षमतेमुळे जगभर मातृदेवता निर्माण झाल्या.त्यांची प्रतिके, पूजा सुरु झाली.योनीपूजेमुळे वारूळ, कवडीची पूजा सुरु झाली.नाग, लिंगपूजा हा असाच प्रघात आहे.कुंभ, घट हे गर्भाशयांचे प्रतीक मानले गेले.गुढी देखील सृजनाचे प्रतीक आहे.मिथक ही घडून गेलेल्या घटनांची स्पष्टीकरणे असतात.मिथक समजून घेताना तर्क लावले पाहिजेत. समता निर्माण करण्याचे उद्दिष्ट असले पाहिजे‘.डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’ कथातून मिथक पुढे आणली जात आहेत.त्याचे शास्त्र झाले. हा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. वर्चस्व कबूल करण्यासाठी, उच्च –नीच श्रेणी निर्माण करण्यासाठी मिथकांचा वापर केला जातो.साहित्य म्हणजे इतिहास नव्हे,हे लक्षात घेतले पाहिजे. दंगे घडविण्यासाठी खोटी मिथके वापरली जातात.युद्धांचा देखील खरे-खोटेपणा इतिहास दाखवला जातो.सत्य समजण्यासाठी सामुदायिक शहाणपण,विवेक असला पाहिजे‘.