मुसळधार पावसाचा वीजयंत्रणेला मोठा तडाखा; अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे वीजपुरवठा सुरळीत

Dilip KurhadePune21/05/202546 Views

सौजन्य चॅट जिपीटी प्रातिनिधिक चित्र

मुसळधार पावसाचा वीजयंत्रणेला मोठा तडाखा;

अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे वीजपुरवठा सुरळीत

पुणे: पुणे शहर व परिसरात मंगळवारी  सायंकाळनंतर मुसळधार पावसाने हजेरी दिली. विविध ठिकाणी झाडपडीचे प्रकार तसेच जमिनीवरून वेगाने वाहणार्‍या पाण्याच्या लोंढ्यांनी वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला. यात प्रामुख्याने कोंढवा परिसरासह पुणे शहरातील काही भागात तसेच भोसरी व चाकण परिसरामध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम करीत सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे तर कोंढवा परिसरात आज पहाटे टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

पुणे शहरात प्रामुख्याने कोंढवा परिसर मुसळधार पावसामुळे जलमय झाला होता. चढउतार असलेल्या या भागात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे ३८ फिडर पिलरमध्ये पाणी शिरले. वीजसुरक्षेची खबरदारी म्हणून कोंढवा, जेके पार्क व कुमारपाम या तीन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे कोंढवा परिसरातील सुमारे ३८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. पाऊस व पाणी ओसरल्यानंतर महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती कामे सुरू केली. पाणी शिरलेल्या फिडर पिलरमधील पाणी काढून कोरडे करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर सकाळी ६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने या परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला. तसेच वीजखाबांवर झाडे व फांद्या पडल्यामुळे तारा तुटल्या. त्यामुळे महर्षीनगर, मार्केटयार्ड, प्रेमनगरचा काही भाग, मुंढवा, बंडगार्डन, फुरसुंगी, कोथरूड, शिवणे, धानोरी, धायरी फाटा आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. याच कारणांमुळे भोसरी गाव, तळवडे, देहू गाव, शेलारवस्ती, चिखली, चऱ्होली, दिघी, भोसरी गाव, यमूनानगर, विठ्ठलवाडी, रूपीनगर, आळंदी रोड, इंद्रायणीनगर, चिंचवड स्टेशन, संतनगर, आदर्शनगर, खडी मशीन, शांतीनगर या भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या सर्व भागातील वीजपुरवठा तातडीने दुरुस्ती कामे करून रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये चाकण व परिसरात मुसळधार पावसामुळे महावितरणचे उच्च व लघुदाबाचे १० वीजखांब कोसळले. त्यामुळे चाकण, कुरुळी, निघोजे, सारा सिटी, नाणेकरवाडी, म्हाळुंगे, आंबेठाण या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पहाटेपर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला आहे.

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध- वीजपुरवठा खंडित होणे किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी वीजग्राहकांकरिता महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. या टोल फ्री क्रमाकांवर ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते व लगेचच संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते. यासह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देण्याची किंवा मोबाइलवरून NOPOWER<ग्राहक क्रमांक> हा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविण्याची सोय उपलब्ध आहे.

Recent Comments

No comments to show.
Categories
Loading Next Post...
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...