मोनालिसा ‘ आणि ‘ द लास्ट सपर.’

मोनालिसा ‘ आणि ‘ द लास्ट सपर.
प्रबोधन काळातील अलौकिक प्रतिभेचा कलाकार म्हणजे लिओनार्दो दा विंची हा होय.चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ,वैज्ञानिक,संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्वज्ञ या सगळ्या भूमिका एकाचवेळी लीलया निभावणाऱ्या लिओनार्दो चा जन्म १५ एप्रिल १४५२ साली इटलीतल्या फ्लॉरेंन्स जवळ असलेल्या विंची या गावांमध्ये झाला.लिओनार्दो ने अनेक अजरामर कलाकृती आपल्या कारकिर्दीत तयार केल्या. ‘मॅडोना ऑन द रॉक्स’,’मोनालीसा’,’ लास्ट सपर’ या सारख्या चित्रांनी त्याचे नाव जगभर अजरामर झाले.
‘ मोनालिसा’ हे इटालियन चित्रकार लिओनार्दो दा विंची याने तैलरंगात काढलेले चित्र जगात उत्कृष्ट कलाकृती म्हणून मान्यता पावले आहे. सध्या हे चित्र पॅरिस येथील लुब्र कला संग्रहालयात आहे.मोनालिसाच्या चेहऱ्यावरील गूढ आजही अनेकांना कोड्यात टाकते आहे.हे चित्र त्याने १५०३ ते १५०५ या काळात काढले आहे.कलेच्या इतिहासात हे विलक्षण व अजोड असे व्यतिचित्र म्हणून मान्यता पावलेले आहे.चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ,खोल,अथांग भाव दर्शविले आहेत त्याने लक्षावधी रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले आहे.मोनालीसाच्या पार्श्वभूमीवरील काल्पनिक निसर्गदृश्यही गुढतेत भर घालत आहे.तांत्रिक दृष्ट्या या चित्राचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे लिओनार्दोने त्यात केलेला ‘स्फुमातो ‘ तंत्रांचा केलेला वापर.या तंत्रामध्ये व्यक्तिचित्राच्या धूसर केलेल्या बाह्यरेषा व सौम्य रंगाचा केलेला वापर होय.या चित्राचा आकार ३० इंच ×२१ इंच असा आहे.हे चित्र लुब्र कला संग्रहालयात कडेकोट बंदोबस्तात ठेवले आहे.जगातील अति मौल्यवान कलाकृती पैकी एक असलेल्या या चित्राचा अभ्यास जगभरातील अनेक संशोधक करीत आहेत.
‘ लास्ट सपर’ ही लिओनार्दो ची अतिशय अप्रतिम अशी कलाकृती. सेंट मेरी डेल ग्रॅझी या चर्चच्या भिंतीवर रेखाटलेले हे चित्र जगातील उत्कृष्ट चित्रांपैकी एक समजले जाते.येशू ख्रिस्त यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगाचे चित्रण या चित्रात केले आहे.एका सणाच्या दिवशी येशू ख्रिस्त यांचे बारा शिष्य भोजनासाठी बसलेले असतात. त्या चर्चेदरम्यान प्रभू येशू शिष्यांना म्हणतात की ,’ तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करणार आहे.’येशूंचे हे वाक्य ऐकताच सगळ्या शिष्यांना धक्का बसतो.हाच क्षण लिओनार्दो ने या चित्रात अचूक पकडला आहे. प्रत्येक शिष्य एकमेकांकडे संशयाने पाहू लागतो. हा विश्वासघात करणारा  शिष्य म्हणजे ‘ जुडास ‘ होय.येशूंच्या वाक्याने जुडास चा चेहरा काळवंडून गेलेला दिसतो.येशूंकडे पाहण्याचे त्याला धैर्य होत नाही.इतर पात्रे हातवारे करून एकमेकांशी बोलताना दिसतात. येशू ख्रिस्त यांच्या अंतकाळाचे सावट असलेला  हा प्रसंग लिओनार्दो ने कौशल्याने चित्रित केला आहे.हे चित्र ‘ फ्रेस्को’ तंत्रामध्ये केले आहे. या तंत्रामध्ये प्लास्टर ओले असतानाच त्यात रंग मिसळले जातात. त्यामुळेच हे चित्र ताजेतवाने वाटते.लिओनार्दो ने ‘लास्ट सपर’ हे चित्र १४९५ ते१४९८ या दरम्यान तहानभूक विसरून व जीव ओतून पूर्ण केले आहे ; आणि म्हणूनच हे चित्र उत्कृष्टतेचा नमुना म्हणून आजही पाहिले व जगभरात अभ्यासले जाते.

   सुदाम कृष्णाजी विश्वे,
 

    ( निवृत्त कलाशिक्षक )
         पुणे – ४११०२१.
         मो नं. – ९८६०५८६१४७.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...