वर्षभरात एकाच ‘सायकल’ ची चोरी
गुन्ह्यांची संख्या कमी व्हावी म्हणून सायकल चोरीचा गुन्हा बॅन
येरवडाः पुणे शहर हे एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळख जात होते. त्यानंतर या सायकलींची जागा दुचाकी वाहनानी घेतली. त्यानंतर सायकली कमी झाल्या. शहरात लहान सहान चोरीच्या घटनेत चोरट्यांचे लक्ष सायकलींवर असायचे. या सायकली किरकोळ भंगारात विकल्या जात होत्या. सायकल मालकाने सायकल चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात केली तर अशा सायकलींच्या गुन्ह्यांचा तपास उघडकीस येत नसे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील दाखल व उघड गुन्ह्यांची संख्या वाढलेले दिसत असायचे सहाजिकच वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यातील अधिका-यांची झाडाझडती घेत. यावर उपाय म्हणून पुणे शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याच पोलीस ठाण्यात सायकल चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. मात्र आश्चर्य येरवडा पोलीस ठाण्यात एका सायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कामगार वर्गात आजही सायकल ला अन्यन्य साधारण महत्त्व आहे. आजही वृत्तपत्र विक्रेत्यांपासून ते कारागीरांसह विद्यार्थी सायकलींचा प्रवासासाठी वापर करतात. तर व्यायामाची आवड असलेले सायकलिंग साठी सायकलींचा वापर करतात. या सायकलींची किंमत सहा हजारापासून ते दीड दोन लाख रूपयापर्यंत या सायकलींची किंमत असते. हीच सायकल चोरीला गेल्यास त्याची किंमत शून्य होते. चोरटा ही सायकल कवडीमोल किंमतीत भंगारवाल्यांना विकतो. भंगारवाला काही क्षणात सायकलींचे सर्व पार्ट वेगळे करून तो पुढे विकण्यासाठी तयार होतो.
चोरीला गेलेल्या सायकलची कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जात नाही, असा पोलिसांचा अलिखित नियम आहे. त्यामुळे ही सायकल हजाराची असो वा दीड दोन लाखाची पोलीसांच्या दृष्टीने त्याची किंमत पुन्हा शून्य रूपये. उगाच गुन्ह्यांची संख्या वाढवायला नको आधीच गंभीर गुन्ह्यांचा तपास करता करता मेटाकुटीला आलेले पोलीस सायकल चोरीची तक्रार करण्यासाठी आलेल्यांना तक्रार न घेता परत पाठवतात. त्यामुळे सायकल परत मिळणारच नाही अशा विचारात तक्रारदार परत घरी येतात.
शहरात दुचाकी ठेवायला जागा नाही म्हणून अनेकजण सायकली बाहेर जागा मिळेल तेथे लावतात. अशा सायकली चोरल्याने पोलीस काही करत नसल्याचा समज झाल्याने चोरट्यांचे फावते. त्यामुळे लहान मुलांचे असो वा मोठ्यांच्या सायकली किंवा व्यायामासाठीच्या गेअरच्या महागड्या सायकली सर्रास चोरीला जातात पण याची साधी दखल सुद्धा पोलीस घेत नाहीत. चोरीची सायकल शोधणे तर लांबच राहिले.
कल्याणीनगर येथील सायकल चोरीची नोंद
कल्याणीनगर येथील एका सोसायटीतील रितेश कुमार यांनी सायकल चोरीची फिर्याद दिली आहे. ॲागस्ट मध्ये ही सायकल त्यांनी वाहनतळात लावली होती. सायकल व्यायामासाठी ते वापरत होते. सायकल महागडी असली तरी त्याची किंमत पोलीस ठाण्यात पंधरा हजार रूपये दाखविण्यात आली आहे. त्याचा तपास पुढे झाला नाही हे सांगायलाच नको.
“ सायकल चोरीचे गुन्हे विशेषतः दाखल केले जात नाही. अशा सायकली सापडत नाहीत. सापडल्या तरी त्याचा मालकाला उपयोग होत नाही. मात्र सध्या व्यायामासाठी धेतल्या जाणा-या सायकलीच्या किंमती जास्त आहेत. त्यामुळे वापरणा-यांनी त्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.”