वानवडीत पोलीसांचा हुक्का पार्लरवर छापा; चौघांविरोधात गुन्हा दाखल
पुणे: साळुंखे विहार रस्त्यावरील ‘दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन’ वर वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने छापा टाकला . या ठिकाणी अवैधरित्या सुरू असलेला हुक्का पार्लर उध्वस्त केला. या कारवाईत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तंबाखूजन्य हुक्का साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती वानवडी पोलीसानी दिली.
पोलीस उप-निरीक्षक धनाजी टोणे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना यासंदर्भात माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी ‘दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन’ येथे छापा टाकून तपासणी केली असता, तेथे हुक्का फ्लेवर व त्याचे साहित्य विक्रीसाठी ठेवलेले आढळले. आरोपी हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पुरवठा करताना सापडले.
या कारवाईत नारायण मगर थापा (वय ३३, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), चंदनकुमार श्रीतेवन राय (वय २२, रा. दि स्पाईसी फ्लोअर कॅफे, साळुंखे विहार रोड), इनायत मजीद सल्ला (वय ५२, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), जावेद मलिक शेख (वय ४२, रा. कॅम्प, गोळीबार मैदान) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून तीन हजार २१५ रुपये किमतीचा हुक्का फ्लेवर व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५ नुसार नोटीस देण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस उप-निरीक्षक धनाजी टोणे हे करीत आहेत.