
वैशाली भानुदास खांदवे-हुलावळे, गुणवत्ता, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रवास
सौ. वैशाली भानुदास खांदवे-हुलावळे, M.A. B.Ed. पदवीधर, यांनी अखंड 34 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून पुणे
शहरातील शिक्षणाचा प्रसार आणि गुणवत्ता वृद्धीसाठी अपूर्व योगदान दिले आहे. सध्या त्या पुणे मनपा
विद्यानिकेतन क्रमांक 17, विश्रांतवाडी येथे कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी त्यांनी सदैव अधिक वेळ देत विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले असून
त्यांच्या शिस्तप्रियता, ज्ञाननिष्ठा आणि विद्यार्थ्यांबद्दलच्या आत्मीयतेमुळे शिष्यवृत्ती, NMMS, मंथन, MTS, हिंदी राष्ट्रभाषा
सभा आणि भारती विद्यापीठ अशा विविध परीक्षांत सुमारे 75 विद्यार्थी गुणवंत ठरले आहेत. शालेय जीवनाचे
आकर्षण, ज्ञानार्जनाची ओढ, राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका
बजावली आहे.
साक्षरता अभियान, राष्ट्रीय समूहगान, जनगणना, निवडणूक कर्तव्य, BLO कार्य आणि कोविड काळातील जबाबदाऱ्या
त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. नाट्यप्रवेश, लोकनृत्य, समूहगान आणि गायन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना घडवून
त्यांनी अनेक यश मिळवून दिले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्पर्धेत त्यांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक
विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील हजार विद्यार्थ्यांमधून निवडला जाऊन CBSE बोर्डात बारावीपर्यंत मोफत शिक्षण घेऊ शकला.
त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव दूरचित्रवाणीवरही झाला असून राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय प्रशिक्षणांमध्ये
त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून योगदान दिले आहे. कोविड काळात गरजू विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन स्वखर्चाने
जीवनावश्यक वस्तू पुरवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.