शहरी धोरणांवर गोलमेज संपन्न!

Dilip KurhadeCityPuneSocial10/05/2025155 Views

पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या शहरी धोरणांविषयी काम करणाऱ्या आमच्या अभ्यासगटातर्फे पुण्यात आज एक दिवसभराची एक गोलमेज बैठक आयोजित करण्यात आली होती.

शहरी धोरणांवर गोलमेज संपन्न! (Roundtable on Urban Policy)

पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या शहरी धोरणांविषयी काम करणाऱ्या आमच्या अभ्यासगटातर्फे पुण्यात आज एक दिवसभराची एक गोलमेज बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘महापालिकांचे अर्थसंकल्प आणि शहरांची अर्थनीती’ या विषयाला धरून ही बैठक संपन्न झाली. राजकीय नेते, नागरी गटांचे प्रतिनिधी, अर्थतज्ज्ञ, प्रसिद्धीमाध्यमांतील व्यक्ती, विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या नागरिकांना या बैठकीसाठी निमंत्रित केले होते.

दिवसभरात दोन सत्रांमध्ये ही बैठक झाली. सकाळच्या सत्रात शहरांचे अर्थसंकल्प आणि एकूणच अर्थकारण या विषयात असणारे प्रश्न, अडचणी आणि आव्हाने याची मांडणी प्रत्येक सहभागी व्यक्तीने केली. तर दुपारनंतरचे दुसरे सत्र पुण्याचे माजी आयुक्त आणि सध्या यशदाचे अतिरिक्त संचालक असणाऱ्या शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी पहिल्या सत्रात मांडलेल्या अडचणी आणि समस्यांवर काय उपाययोजना असू शकतात याविषयी सविस्तर चर्चा केली गेली. महानगर्पलीकांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याबरोबरच उभा राहणारा पैसा योग्य पद्धतीने वापरला जाणे, त्याबद्दल पारदर्शकता बाळगणे या मुख्य मुद्द्यांना धरून अतिशय रचनात्मक अशी ही चर्चा झाली. केवळ टीका नाही तर प्रत्येक पातळीवरील (शहर, राज्य, व केंद्र) सरकार यांच्यासाठी काही सूचना व मागण्या या मंथनातून पुढे आल्या. सर्वांनी एकमताने पाठींबा दिलेल्या या मागण्या एकत्र करून पुढच्या काही दिवसात शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत.

अशा प्रकारे नागरिकांनी नेमक्या सूचनांचा मसुदा सरकारला सादर करून चिकाटीने पाठपुरावा केला तर बदल नक्की घडेल असा आशावाद शेखर गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.

पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे मार्चमध्ये घेतलेल्या निबंध स्पर्धेत विजयी झालेल्या साजिरी कामत, वरुण साळवी आणि शीफा के या तिघांचा सत्कारही यावेळेस केला गेला. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनच्या संचालिका नेहा महाजन यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष तन्मय कानिटकर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. शहरी धोरणांशी निगडीत वेगवेगळ्या विषयांना घेऊन अशा अनेक गोलमेज बैठका आयोजित करण्याचा पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनचा मानस आहे.

गोलमेज बैठकीत सहभागी व्यक्ती शेखर गायकवाड (अतिरिक्त संचालक, यशदा),  विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच),  मंदार शिंदे (बालहक्क कृती समिती),  डॉ सायली जोग (प्राध्यापिका, गोखले इन्स्टिट्यूट),  हर्षद अभ्यंकर (संचालक, सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट), डॉ विष्णू श्रीमंगले (मनोदय संस्था),  दीपक जाधव (जागल्या, आरोग्य हक्क समिती),  शीतल पवार (कार्यकारी संपादक, सकाळ मिडिया),  संग्राम खोपडे (रेडीओ जॉकी आणि सामाजिक कार्यकर्ता), प्रज्ञा शिदोरे (ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टिंग),  वैभवी पिंगळे (अर्थशास्त्र प्राध्यापिका), इंद्रनील सदलगे (सहकारनगर नागरिक मंच), मनोज जोशी (वेदभवन नागरिक मंच), अतुल पाटील (बावधन नागरिक मंच),चंदन देसाई (TDH, India), मयूर रानडे (राजकीय अभ्यासक, सल्लागार), नेहा महाजन (संचालिका, पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन), तन्मय कानिटकर (अध्यक्ष, पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन), अंकिता अभ्यंकर सचिव, पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन, डॉ शारदा बापट, आर्य कल्याणकर, संकेत दगडे, रमा कुकनूर, ओंकार गोडगे 

Recent Comments

No comments to show.
Categories
Follow
Search Trending
Loading

Signing-in 3 seconds...

Signing-up 3 seconds...