शाळाबाह्य मुलांसाठी अविरत काम : सुदर्शन चखाले.
खरे तर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शालेय शिक्षण विभागाचे ; परंतु एक सामाजिक कार्यकर्ता असा आहे की त्याने मनाशी ठरवले आहे की शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचे.त्या कार्यकर्त्याचे नाव आहे सुदर्शन चखाले.येरवडा येथे १९९६ मध्ये जन्म झालेले व येरवडा येथील वस्ती मध्ये बालपण गेलेले सुदर्शन चखाले यांनी ठरवले की शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणूनच रस्त्यावर भीक मागणारे,छोट्या मोठ्या वस्तू विकणाऱ्या मुलांना शाळेत घालायचे.आणि मग सुरू झाले प्रवेश अभियान.
सुदर्शन चखाले यांचे शिक्षण येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात झाले.शाळेत असताना सुदर्शन हे हे खूप द्वाड विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते.शिक्षकांना जास्तीत जास्त कसा त्रास देत येईल हे पहात असत.मस्तीखोर, वात्रट असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.शिक्षक अगदी त्रासून जात.शिक्षक त्यांना शिक्षा करीत; पण शिक्षकांचा मर लागू नये म्हणून ते विविध युक्त्या करीत.पण कधी शिक्षकांना उलट उत्तरे देत नसत.त्याच वेळेस शिक्षकांच्या लक्षात आले की हे पाणी वेगळेच आहे.
शालेय वयात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत प्रवेश केला.प्राथमिक व द्वितीय स्तरावरील त्यांचे शाखेतील प्रशिक्षण पूर्ण झाले ; पण त्यांचा स्वभाव म्हणजे अधिकाधिक प्रश्न विचारणे.शाखेत अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली नाहीत.मग त्यांच्या लक्षात आले की संघाची विचारधारा आपल्याशी मिळती जुळती नाही.आणि मग त्यांनी आपला मार्ग बदलला.त्याच दरम्यान त्यांची भेट युवक क्रांती दलाचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांचे बरोबर झाली ; आणि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली.२०१४ मध्ये सुदर्शन कुमार सप्तर्षी यांच्याबरोबर जोडले गेले. डॉ कुमार सप्तर्षी यांनी पहिला मंत्र दिला तो म्हणजे महाराष्ट्र जाणून घेणे.त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र दोन वेळा फिरून अनुभवला.अनुभवाचे संचित साठत होते.२०१५ मध्ये आत्ताच्या अहिल्यानगर येथील गिरीशजी कुलकर्णी यांच्या स्नेहालय मध्ये सांगड शिबिराच्या निमित्ताने जाण्याचा योग आला.उल्का महाजन तिस्ता सेटलवाड यांच्या व्याख्यानाने त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. आणि मग जीवनाचे ध्येय ठरले गेले.उपेक्षितांसाठी जीवन अर्पित केले. युवक क्रांती दल अर्थात युक्रांद मध्ये काम करताना कुमार सप्तर्षी यांनी पुणे शहर संघटक ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.’युवा नेतृत्व विकास शिबीर’ त्यांनी आयोजित केले. संविधानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या या कामी त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सी ए ए, एन आर सी या आंदोलनात ही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांनी दिल्लीवारी देखील केली
रोहित वेमुला यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मनावर आघात झाला.त्याच निषेध म्हणून १२ फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निदर्शने केली. लोकशाही आणि संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी त्यांनी अनेक महाविद्यालयात व्याख्याने दिली.संप,निदर्शने, बंद चालूच होते ; पण त्यांना वाटायला लागले की याबरोबरच संस्थामक कार्य ही गरजेचे आहे. आणि मग त्यांनी ‘ ज्योतिबा सावित्री फाउंडेशन’ ची स्थापना केली. त्यानी त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित केले ते म्हणजे ‘ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अने.’त्यांनी व त्यांच्या संस्थेने आजपर्यंत २६० शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. हे काम यापुढेही निरंतर सुरू राहणार आहे. युवकांमध्ये संविधानिक मूल्ये रुजावी म्हणून दर रविवारी ‘ संविधान कट्टा’ आयोजित केला जातो.तसेच दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी संविधान कार्यशाळा आयोजित केली जाते.
दर महिन्याला ‘ गांधी दर्शन शिबीर ‘ आयोजित करून २०० ते २५० लोकांना मार्गदर्शन केले जाते. महात्मा गांधी, महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा त्यांनी स्वीकारली आहे.समता बंधुता यावर त्यांचा विश्वास आहे. बी ए, एम एस डब्ल्यू असे उच्च शिक्षण त्यांनी घेतले आहे. लोकशाही, संविधान यावर त्यांचा विश्वास आहे. पुढे जाऊन उपेक्षितांच्या जीवनात आनंद पेरणे,त्यांच्या मुलांना शालेय शिक्षणाची संधी निर्माण करून देणे हेच त्यांनी जीवनाचे लक्ष निर्धारित केले आहे.त्यांना त्यांच्या कामात यश मिळो हीच सदिच्छा!
श्री.सुदाम कृष्णाजी विश्वे,
( निवृत्त कलाशिक्षक )
पुणे – ४११०२१.
मोबाईल नंबर – ९८६०५८६१४७.