संविधानामुळेच सर्व समूहाला संधी मिळाली
— संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्व जाती व धर्मातील लोकांसाठी संविधान लिहिले . संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच आज सर्व समूहांना संधी मिळाली. मी पण आरक्षणाचा लाभार्थी असून संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच आज आम्ही प्रगती करत असल्याचे गौरव उद्गार राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी संविधान गौरव संमेलनात बोलताना व्यक्त केले .
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने दिनांक ९ मे २०२५ रोजी संत एकनाथ सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त “संविधान गौरव” संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रगीत, राज्यगीत व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले . तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शिरसाट म्हणाले की समाज कल्याण व बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रमाणिकपणे काम करावे. बार्टीतील १२०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची गेल्या दहा वर्षापासून वेतन वाढ करण्यात आली नव्हती ती वाढ नियमानुसार केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याचे निर्देश त्यांनी प्रधान सचिव व महासंचालक बार्टी यांना दिले. बार्टी मुख्यालय पुणे येथे व छत्रपती संभाजी नगर येथे बार्टीची भव्य देखणी नविन प्रशासकीय इमारत लवकरच उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मिलिंद महाविद्यालयाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. समाज कल्याण मार्फत नवीन १२१ वसतीगृह उभारणार असल्याची त्यांनी सांगितले. समाज कल्याणचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांनी संविधान गौरव सोहळ्यात बोलताना मा मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतूनच घरघर संविधान हा उपक्रम राज्यभर राबवत असल्याचे सांगून या देशाला एकसंघ बांधण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेने केले आहे . बार्टीतील कर्मचाऱ्यांची वेतन वाढ केली असून त्यांनी गतीने काम करावे तसेच संविधानाचा प्रसार व प्रसार करावा असे मत व्यक्त करून त्यानी संविधानाचा प्रचार बार्टी करत असल्याबद्दल बार्टीचे अभिनंदन केले .
मंत्री महोदय यांच्या पुढाकाराने बार्टीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्री संजय शिरसाट, प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, महासंचालक सुनिल वारे यांचा बुद्ध मूर्ती भारतीय राज्यघटनेची प्रत, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला .
कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे यांनी मंत्री महोदय, प्रधान सचिव, समाज कल्याण आयुक्त, महासंचालक बार्टी यांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, महासंचालक सुनिल वारे, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे, माजी महापौर नंदकुमार बडोले, विकास जैन, हर्षदा शिरसाट, बार्टीचे विभागप्रमुख उमेश सोनवणे, शुभांगी पाटील, संतोष बोर्डे, सचिन बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. संविधान गौरव संमेलनास मोठ्या संख्येने विद्यार्थी नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर समाज कल्याण व बार्टीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी केले. आभार निबंधक इंदिरा अस्वार यांनी मानले.. संविधान सन्मान सोहळा गौरव संमेलन यशस्वी होण्यासाठी बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.