सखी वन स्टॉप केंद्रावर ८८९ संकटग्रस्त महिलांना मदत
राज्यात पुणे जिल्ह्यातील वन स्टॉप केंद्र अव्वल
येरवडा: महिला व बाल विकास आयुक्तालया मार्फत संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सखी वन स्टॉप केंद्राची स्थापना केली गेली आहे. याठिकाणी १८१ या महिला हेल्पलाईन व पोलीस ठाण्यातून आलेल्या पीडितग्रस्त महिलांना वैद्यकीय सहाय्य, समुपदेशन, निवारा, कायदेशीर मदत केली जाते. गेल्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील ८८९ पीडितग्रस्त महिलांना मदत केली आहे. राज्यातील पुणे सखी वन स्टॉप सेंटर हे अव्वल असल्याची प्रशंसा गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचे सहसचिव प्रितम यशवंत यांनी केले होते.
महिला व बालविकास आयुक्तालयाचे पुणे जिल्ह्याचे मुंढवा येथे सखी वन स्टॉप सेंटर ( ओएससी) आहे.या ठिकाणी १८१ या महिला हेल्पलाईनवर मदत मागणाऱ्या पीडित महिला व पोलिस ठाण्यातून आलेल्या संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत केली जाते. येथे आलेल्या पीडित व संकटग्रस्त महिलांना गरजे प्रमाणे वैद्यकीय उपचार दिले जातात. त्यानंतर त्यांचे समुपदेशन केले जाते. नेमकी त्यांची समस्या काय आहे याचा सविस्तर अहवाल तयार केला जातो. वन स्टॉप सेंटरवर पीडित महिलांना पाच दिवस निवारा दिला जातो. याठिकाणी त्यांना मोफत चहा, न्याहरी, जेवणाची सोय केली जाते.
सखी वन स्टॉप सेंटर मध्ये पाच दिवस ठेवल्यानंतर आणि पीडित महिलांचे समस्या निवारण न झाल्यास त्यांना पुढील तीन महिने महिला राज्य गृहात ठेवले जाते. याठिकाणी कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत पीडित असल्यास विधी सेवा प्राधिकरणाकडून कायदेशीर मदत आणि समुपदेशन केले जाते. महिलांच्या समस्या निवारण होई पर्यंत मदत केली जाते. आता पर्यंत ८८९ पीडितांना मदत करुन त्यांचे पुनर्वसन त्यांच्याच कुटुंबात केले आहे.
मुंढवा येथील वन स्टॉप सेंटरमध्ये सविता वाडेकर समुपदेशक, गुलशनी केरकट्टा केस वर्कर, विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्या ॲड परिक्रमा खोत, पॅरामेडिकल स्टाफ योगिता कांबळे, माहिती आणि तंत्रज्ञान अभियंता सुतित्रा मारणे आदी टीमवर्क म्हणून कार्यरत असल्याचे सखी वन स्टॉप सेंटर निवासी केंद्र प्रशासनक सविता भोरे यांनी सांगितले
‘‘ सखी वन स्टॉप सेंटरमध्ये गेल्या वर्षभरात ८८९ पीडित व संकटग्रस्त महिलांना सर्वोतोपरी मदत केली आहे. त्यामुळे कित्येक कुटुंब पुन्हा उभे राहिले आहे. पीडित व संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय सहाय्य, विधी सेवा प्राधिकरणाच्या मदतीने कायदेशीर मदत व समुपदेशन केले जाते.’’
– मनीषा बिरारीस, जिल्हा महिला य बाल विकास अधिकारी
होप फॉर चिल्ड्र्नचे मोठे योगदान
पुणे जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटरची अंमलबजावणी स्वयंसेवी संस्था म्हणून होप फॉर चिल्ड्रनचे योगदान मोठे आहे. त्यांनी येथील पायाभूत भौतिक सुविधांसह मनुष्यबळ पुरविले होते. देशभरात पुण्यातील सखी वन स्टॉप सेंटर उत्कृष्ट असल्याचे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने कौतुक केले आहे.