सहेला रे..’ गानमैफलीला रसिकांचा भरघोस प्रतिसाद
भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशनचे आयोजन
पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कलाश्री’ प्रस्तुत ‘सहेला रे..’ ही गानमैफल भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात सादर झाली. रसिक श्रोत्यांच्या भरघोस उपस्थितीत आणि उत्स्फूर्त प्रतिसादात ही सांगीतिक संध्या रंगली.
या मैफलीत गायिका डॉ. राधिका जोशी आणि गायक अभिषेक काळे यांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या रचना अत्यंत भावपूर्ण सादर केल्या. डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या आशयपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमाला एक वेगळेच साहित्यिक व कलात्मक परिमाण लाभले.भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले आणि त्यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार ज्ञानेश्वरीची प्रत आणि प्रशस्तिपत्रक देऊन करण्यात आला.
मैफलीची सुरुवात डॉ.राधिका जोशी यांनी राग भूपमधील ‘सहेला रे’ या रचनेने केली. त्यानंतर ‘कलाश्री’, ‘राम रंगी’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘जमुना के तीर’, ‘ भाग्यदा लक्ष्मी बारम्मा अशा विविध रचना अभिषेक काळे यांनी सादर केल्या. डॉ. राधिका जोशी यांनी ‘म्हारो प्रणाम’, ‘ जाईन विचारित रानफुल’, ‘’, किशोरीताईंनी स्वरबद्ध केलेली गझल, तसेच ‘बोलावा विठ्ठल’, ‘अवघा रंग एक झाला’ अशा सशक्त गायनरचना सादर केल्या. आणि रंगलेल्या मैफलीचा समारोप केला.
या गानसंध्येस मालू गावकर (हार्मोनियम) आणि रामकृष्ण करंबेळकर (तबला) यांची प्रभावी साथ लाभली.
‘ सहेला रे’ ही मैफल भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत आयोजित २४४ वा कार्यक्रम होता . या मैफिलीला प्रवेश विनामूल्य होता .हा कार्यक्रम १७ मे २०२५ रोजी सायंकाळी झाला.