
सुधाकर रघुनाथ भावसार, समाजसेवा, संस्कार आणि कलात्मकतेचा विलक्षण प्रवास
श्री. सुधाकर रघुनाथ भावसार यांचा जन्म १ जून १९६६ रोजी नेरी बु्द्रुक, ता. जामनेर, जि. जळगाव येथे झाला. मुंबई,
सांगली आणि सातारा येथून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये पुण्यात मास्टर इन सोशल वर्क
(एमएसडब्ल्यू) तसेच ट्रॅव्हल अँड टुरिझममधील पदव्युत्तर डिप्लोमा मिळवला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहात वास्तव्यास असताना ‘कमवा व शिकवा’ योजनेअंतर्गत क्रिकेट महर्षी दि. ब.
देवधर यांची सुश्रुषा आणि थोर समाजसेविका विद्या बाळ यांच्या ‘मिळून साऱ्यांजणी’ मासिकात मदतनीस म्हणून काम
केले. याच काळात महाराष्ट्राचे थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे मदतनीस म्हणून अनेक वर्षे त्यांच्या घरी वास्तव्यास
राहून सेवा केली. पु. ल. यांच्यासोबत आनंदवनात वास्तव्यास असताना बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्यासोबत
तीन महिने घालवण्याचा सन्मान मिळाला, ज्याचा उल्लेख साधनाताईंनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. या काळात
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार सुधीर फडके आणि पं. भीमसेन जोशी यांसारख्या दिग्गजांचा सहवास लाभला.
१९९२ मध्ये कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्र आयोजित भारत परिक्रमा यात्रेत महाराष्ट्रातून निवड होऊन ३४८
दिवस १३ राज्यांचा प्रवास करत त्यांनी पथनाट्य आणि जादूचे प्रयोग सादर केले. या यात्रेदरम्यान भारताचे राष्ट्रपती
व्ही. आर. वेंकटरमण यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात पथनाट्य करण्याची संधी मिळाली. १९९५ मध्ये प्रसिद्ध टूर
मॅनेजर म्हणून कार्यरत असताना त्यांनी भारतातील विविध राज्यांसह नेपाळ आणि तिबेटमधील मानसरोवर यात्रांचे
आयोजन केले.
उत्कृष्ट सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण केंद्रातर्फे २००९ मध्ये त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन
माजी मुख्यमंत्री स्व. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुण्यातील असंख्य सामाजिक संस्थांत
विनामूल्य जादूचे प्रयोग सादर करणे, रक्तदानाचे सातत्यपूर्ण योगदान आणि ग्रामीण भागातील गरीब, होतकरू
विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी मदत करणे हे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक महा मेट्रो तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले