हुक्क्यामध्ये फक्त निकोटिन!
‘फॉरेन्सिक’चा अहवाल; गांजा आढळल्यास एक लाख रूपये दंड व दहा वर्षे शिक्षेची तरतूद
पुणे : शहरातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये दिल्या जाणाऱ्या हुक्क्यामध्ये गांजा असल्याचे सर्वश्रृत आहे. मात्र, हुक्क्यामध्ये फक्त निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याचे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक) विभागाने सांगितले. हुक्क्यामध्ये अमली पदार्थ विशेषत: गांजा आढळल्यास संबंधित हॉटेल चालकाला एक लाख रूपये दंड आणि दहा वर्षे शिक्षेची तरतूद आहे. मात्र, गेली कित्येक वर्षांत हुक्क्यामध्ये अशा प्रकारचे अमली पदार्थ आढळलेच नसल्याचा निर्वाळा ‘फॉरेन्सिक’ विभागाने दिला आहे.
शहरात कोणकोणत्या हॉटेल्समध्ये हुक्का सुरु आहे, याची गुन्हे शाखेकडे असते. यासह स्थानिक सर्वच पोलिस ठाण्यांना असते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या हॉटेल्सना तोंडी व लेखी तंबी वेळोवेळी देतात. विमानगर, येरवडा व कोरेगाव पार्क, चंदननगर यासह चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याने काहींनी हॉटेल्समधील व हर्बलच्या नावाखाली सुरू असलेल्या हुक्का पार्लरमधील नुमने पडताळण्यासाठी गृह विभागाच्या ‘फॉरेन्सिक’ मध्ये पाठविले होते. या संदर्भात तेथे चौकशी केल्यानंतर हुक्क्यामध्ये निकोटिनसह विविध फ्लेवर असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील विविध ठिकाणी छापे मारून सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियमा अंतर्गत व अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलमाअंतर्गत नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई करून तंबाखुजन्य उत्पादने व सिगारेट, फ्लेवर तंबाखुजन्य उत्पादने जप्त केली आहेत. मात्र, ही तात्पुरती कारवाई आहे. गांजाची रोपे लावणे, ती जवळ बाळगणे गुन्हा आहे. या गुन्ह्यात एक लाख रूपये दंड व दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे व्यसनाधिन युवकांना शहरातील हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या हुक्क्यामधून गांजाची तलफ भागविता येते. व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टर, समुपदेशक व व्यसनमुक्त होऊन पूर्ववत आयुष्य जगणारे छातीठोकपणे हुक्क्यामध्ये गांजा असल्याचे सांगतात. मात्र, पोलिस हुक्का पार्लरवर कारवाई करून येथील नुमने फॉरेन्सिक विभागात पाठवितात. तेथे नुमन्यांचे रासायनिक विश्लेषण होते. त्याचा अहवाल पोलिसांना पाठविला जातो. दरम्यानच्या प्रवासात हुक्क्यात (गांजा हवेत उडून जाऊन) फक्त निकोटिनचा अंश शिल्लक राहतो. याचा फायदा हुक्का चालकांना मिळतो. गेली कित्येक वर्षांत कोणत्याच हॉटेल चालकांच्या हुक्क्यात गांजा आढळलेले दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षा झाल्याची माहिती समोर येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दर महिन्याला शहरातील पाच ते सहा हॉटेल्सच्या हुक्का पार्लरमधील नुमने संबंधित पोलिस ठाण्यातुन प्राप्त होतात. हुक्क्यामधील द्रावणाचे रासायनिक विश्लेषण केल्यानंतर त्यामध्ये निकोटिन व काही फ्लेवर आढळतात. त्याचा अहवाल पोलिस ठाण्यांना पाठवित असल्याची माहिती न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत देण्यात आली. –
“ दर महिन्याला शहरातील हॉटेल्सच्या हुक्का पार्लरमधील नुमने संबंधित पोलिस ठाण्यातून प्राप्त होतात. हुक्क्यामधील द्रावणाचे रासायनिक विश्लेषण केल्यानंतर त्यामध्ये निकोटिन व काही फ्लेअवर आढळल्यास त्याचा अहवाल पोलिस ठाण्यांना पाठविला जातो.”
उपसंचालक , न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (गृह विभाग)