भाग -१
हॉटेल्स मधील हुक्का पार्लरला राजाश्रय
राजकीय नेतेमंडळींची कुठे मालकी तर कुठे भागीदारी
पुणे ः शहरातील हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या हुक्का केंद्रांना राजाश्रय आहे. ही हॉटेल्स राजकीय नेतेमंडळींच्या मालकीची, तर कुठे भागीदारीत तर कुठे त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांची आहेत. त्यामुळे अशा हुक्का पार्लर सुरू असलेल्या हॉटेल्सवर राजकीय दबाव व हितसंंबंधामुळे पोलिस कारवाई करीत नाहीत. कारवाई झालीच तर ती नावाला केली जाते. त्यामुळे शहरातील युवकांची व्यसनाधिनता दिवसेंदिवस वाढत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या कंपन्या सुरू झाल्यानंतर खराडी व हिंजवडी आयटी पार्कच्या भोवती हॉटेल्सची संख्या झपाट्याने वाढली आहेत. शहरातील उपनगरांसह मध्यवस्तीतील हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू झाले. या हॉटेल्स मधील दैनंदिन कामकाज व्यवस्थापकाच्या नावाने चालतो. पोलिस या ठिकाणी जाताच बड्या नेतेमंडळींची नावे पुढे करून कारवाई टाळली जाते. कारवाई केलीच तर ती हॅाटेल्सच्या व्यवस्थापकावर किंवा कर्मचाऱ्यावर केली जाते. काही दिवसानंतर ही हॉटेल्स त्याच नावाने किंवा नाव व जागा बदलून सुरू होतात. या हॉटेल्सची नावे सुध्दा गुन्हेगारी विश्वातील प्रचलित भाषेतील असतात. तर कधी थेट गुन्हेगारांचे उदात्तीकरण केलेली, युवकांना आकर्षीत करणारी नावे या हॉटेल्सना आहेत. त्यामुळे युवकांची पावले आपोआप अशा हॉटेल्सकडे वळतात. तेथे आलेल्या युवकांना हुक्क्याच्या माध्यमातून व्यसनाच्या जाळ्यात ओढले जाते. हुक्का घेता घेता गांजा, ब्राऊन शुगर आदी अंमली पदार्थांचे व्यसन युवकांना कधी लागते याचा पत्ता लागत नाही. जेव्हा लागतो तेव्हा उशीर झालेला असतो. त्यानंतर त्यांच्या पालकांची धावाधाव व्यसनमुक्ती केंद्राकडे सुरू होते. अशा व्यसनमुक्ती केंद्रातून परत आलेले खूप कमी युवक पुर्ववत आयुष्य जगतात. कित्येकांचे भविष्य अंधकारमय होते. याची झळ त्याच्या कुटुंबाला बसते. याची पर्वां ना राजकीय नेते मंडळींना आहे ना पोलिसांना.
विमानगर मधील हुक्का पार्लर एका माजी मंत्र्यांचे !
विमानगरमध्ये एका रूफटॅापवर सुरू असलेले हुक्का पार्लर चक्क माजी मंत्र्यांचे आहे. तर कोरेगाव पार्क, मुंढवा, कल्याणीनगर, खराडी येथील हुक्का पार्लर माजी नगरसेवकांची आहेत. तर अनेक ठिकाणी राजकीय मंडळींची भागीदारी या हुक्का पार्लरमध्ये आहे. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी गुंतवणूक पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरातील हुक्का पार्लरमध्ये केलेली आहे. त्यामुळे परप्रांतीय मॅनेजमेंट व मालकी आणि भागीदारी राजकीय मंडळींची म्हणून या हुक्का पार्लरकडे वर्षानुर्ष कोणी लक्ष दिल्याचे दिसून येत नसल्याचे वास्तव आहे.