
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मुंबई मध्यवर्ती कारागृहला दिली भेट
मुंबई : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहला शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वयंपाकगृह, हॉस्पीटल विभाग, कम्युनिटी रेडीओ केंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्सींग कक्ष, ई-मुलाखत कक्ष, लिगल एड क्लिनिक, अति सुरक्षा विभाग, विशेष सुरक्षा विभाग व इतर सर्व बंदी बॅरेक येथे प्रत्यक्ष भेट दिली. बंद्यांकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या कारागृहीन सोयी-सुविधेचा आढावा घेतला. यावेळी बंद्यांचा आहार, उपहारगृह, बंद्यांना नातेवाईक व वकिलांशी संपर्क करण्यासाठी उपलब्ध असलेली ॲलन स्मार्टकार्ड दुरध्वनी सुविधांची पाहणी केली. कदम यांनी बंद्यांच्या कोर्टपेशीच्या सुनावणीसाठी उपलब्ध असलेली व्हिडिओ कॉन्फरन्सींग सुविधा, भेटीची सुविधा, बंदी नातेवाईक व वकिल भेटीसाठी उपलब्ध असलेली प्रत्यक्ष भेटीची सुविधा, बंदी नातेवाईक व वकिल यांचेकरीता व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे उपलब्ध असलेली ई-मुलाखत सुविधांचा आढावा घेतला. आरोग्य विषयक वेद्यकिय सोयी-सुवि धा, स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेली वॉटर प्युरीफायरची सुविधा, बंद्यांचे दैनंदिन वापराचे कपडे व बिछाना धुण्याकरीता उपलब्ध असलेली वॉशिंग मशिन सुविधा, बंद्यांना त्यांचे कोर्टपेशी संबंधित न्यायालयीन कामकाजाची दैनंदिन अद्यावत माहिती घेतली. त्यांचे खाजगी रक्कमेची माहिती, नातेवाईक व मुलाखत विषयक माहिती तत्परतेने उपलब्ध होणेकरीता सुरु करण्यात आलेली ई-किऑस्क् सुविधा, बंद्यांवर हालचाली व कारागृह सुरक्षेवर निगराणी व नियंत्रण ठेवण्यासाठी सुरु कार्यान्वित करण्यात आलेली AI प्रणाली आधारीत सी.सी.टी.व्ही. यंत्रणा, आपात्कालीन धोक्याची सुचना देणारी पॅनिक अलार्म प्रणाली, ई-प्रिझन्स प्रणाली, पब्लीक ॲड्रेसिंग प्रणाली इत्यादीबाबत आढावा कदम यांनी घेतला.
जिल्हा नियोजन समिती मार्फत उपलब्ध झालेल्या निधीमधून कारागृहामध्ये करण्यात येत असलेल्या नुतनीकरणाचे व नवीन बांधकामाची (मुख्य प्रवेशद्वार सुशोभिकरण, व्हिडिओ कॉन्फरसिंग कक्ष, उपहारगृह इमारत, जेल कोर्ट, सर्कल क्र.12, सर्कल क्र.1, हॉस्पीटल विभाग) पाहणी केली. कदम यांनी कारागृहातील बंद्यांच्या अडी-अडचणी व विनंती जाणून घेतल्या व त्यांचे निवारण करण्याचे अनुषंगाने उपस्थित संबंधित विभागाचे अधिकारी यांना मार्गदर्शन केले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कारागृह विभागमार्फत बंद्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रम व सोई सुविधेबाबत पॉवरपाँईट (पी.पी.टी.) द्वारे सादरीकरण करुन माहिती दिली. कारागृह अधिकारी व कर्मचारी यांना उद्भवणाऱ्या अडी- अडचणींबाबत विचारपूस करुन उपस्थित झालेल्या अडी-अडवणींचे लवकरात लवकर शासनस्तरावरुन पाठपुरावा करुन निवारण करण्यात येईल असे आश्वासन कदम यांनी दिले.
यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा,डॉ. सुहास वारके , उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग योगेश देसाई, हर्षद अहिरराव, अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह, दत्तात्रय कांबळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-3, वरळी, मुंबई,. अनिल वांढेकर, अतिरिक्त अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह व इतर कारागृह अधिकारी व कर्मचारी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाचे अधिकारीउपस्थित होते .