
चार हजार क्षमतेचे कच्च्या कैद्यांसाठी दोन नवीन कारागृहांचा प्रस्ताव लालफितीत !
येरवडा मध्यवर्ती कारागृहात पक्के कैदी ; फौजदारी न्यायालयाचे काम सुरू
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात तीस बराकींमध्ये २३२३ कैदी क्षमता आहे. मात्र याठिकाणी तब्बल साडे सहा हजार कैदी दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे खुल्या कारागृहाच्या शेजारील तीस एकरात चार हजार कैदी क्षमता असलेले दोन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारला दिले आहे. ही दोनही आठ हजार कैदी क्षमतची कारागृह केवळ कच्च्या कैद्यांसाठी बांधले जाणार आहेत. महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळ या दोन कारागृहांचे बांधकाम करणार आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे दोन वर्षांपूर्वीच होते. मात्र ते लालफितीत आहे. तर जेल रस्त्यावर फौजदारी न्यायालयाचे काम सुद्धा सुरू झाले आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे एकूण कैदी क्षमता २३२३ आहे. मात्र कारागृहात सध्या साडेसहा हजार कैद्यांचे वास्तव आहे. कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराक, सर्कल दोन मध्ये सहा बराक तर किशोर विभागात तीन बराक आहेत. यासह अंडासेल, फाशीची शिक्षा सुनावलेले कैदी, रुग्ण कैदी, ज्येष्ठ नागरिक कैदी, विदेशी कैदी अशांना दाटीवाटीने विविध बाराकींमध्ये ठेवले आहे. यातील जवळपास सत्तर टक्के कच्चे कैदी आहेत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी कच्च्या कैद्यांची संख्या विचारात घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र कारागृहाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने कारागृह प्रशासनाच्या संमतीने राज्य सरकारकडे पाठविले होते. आता मात्र, कैद्यांची पुढील काही वर्षांतील संख्या विचारात घेता चार हजार क्षमतेचे प्रत्येकी दोन कारागृहांची आवश्यकता आहे. यासाठी येरवडा खुल्या कारागृहाची काही एकर जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कारागृहाच्या प्रशासनाच्या सोईनुसार येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या शेजारीच ही दोन प्रशस्त कारागृह बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र ते लालफितीत अडकल्यामुळे नवीन कारागृहाला दिरंगाई होऊ शकते . येरवडा मध्यवर्ती कारागृहात केवळ शिक्षा झालेले पक्के कैदी ठेवले जाणार आहे.
नवीन कारागृहाची इमारत तळ आणि पहिला मजला असणार आहे. समोरच्या बाजुला प्रशासकीय इमारत, वरिष्ठ तुरूंगाधिकारी, तुरूंग अधिकारी यांचे कार्यालय असणार आहे. मध्यवर्ती भागात सेंट्रल किचन, गिरणी, किचन शेजारी दोन बराक, धान्य गोदाम, रुग्णालय, प्रयोगशाळा, औषधांची खोली, वैद्यकीय अधिकाऱ्यांची खोली,पन्नास खिडक्यांची मुलाखत कक्ष,ग्रंथालय, प्रतिक्षालय, सराईत गुन्हेगारांसाठी अतिसुरक्षित तीस खोल्या आदी सोईसुविधा असणार आहे.
नवीन कारागृह आठ हजार कैदी क्षमतेचे
येरवडा मध्यवर्ती कारागृह – ६५ एकरात ( २३२३ बंदी क्षमता)
नवीन कारागृह- ३० एकर : तळ आणि पहिला मजला( ४००० बंदी क्षमतेचे दोन कारागृह)
सराईत गुन्हेगारांसाठी- अतिसुरक्षित ३० खोल्या
बाहेरी सिमाभिंत २१ फूटी तर आतील सिमाभिंत दहा फूटी उंचीची असणार आहे.
येरवड्यात जिल्हा फौजदारी न्यायालयाचे काम सुरू
विमानतळ रस्त्यावरील स.न.१९१, बंगला क्रमांक चार येथील आठ हजार चौरस मीटरमध्ये जिल्हा फौजदारी न्यायालयाची बहुमजली इमारत होत आहे. यामध्ये दोन तळमजली वाहनतळ असून आठ मजली इमारतीत चौवीस न्यायालय असणार आहेत. प्रमुख जिल्हा न्यायाधिशांच्या मार्फत १८० कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. निधी मंजूर झाल्यामुळे फौजदारी न्यायालयाचे काम सुरू झाले आहे.
नवीन फौजदारी न्यायालयाची इमारतीचे आराखडा तयार केला आहे. यामध्ये दोन तळमजली वाहनतळ, आठ मजली इमारतीत २४ न्यायालय असणार आहेत. यामध्ये केवळ फौजदारी खटले चालविले जाणार आहेत. येरवडा मध्यवर्ती कारागृहात दरवर्षी विविध गुन्ह्यातील बारा ते पंधरा हजार आरोपी दाखल होत असतात. यातील सत्तर टक्के कच्चे कैदी असतात. या सर्वांचे खटले फौजदारी न्यायालयात चालतात. त्यामुळे आरोपींना न्यायालयात हजर करणे, त्यानंतर कारागृहात घेऊन जाणे हे अवघड असते. त्यामुळे येरवडा कारागृहाच्या अवध्या दीडशे ते दोनशे मिटर अंतरावर न्यायालय होणे हे पोलिस, न्यायालय आणि कारागृहाच्या सोईचे तर आहे. यासह वेळेची, पैशाची बचत होणार आहे.